|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जवान जयेंद्र तांबडे यांचा हृदयविकाराने मृत्यू

जवान जयेंद्र तांबडे यांचा हृदयविकाराने मृत्यू 

अरूणाचल प्रदेशातील रोहींग येथे होते सेवेत, ताम्हणमळा गावावर शोककळा,

आज अंत्यसंस्कार

प्रतिनिधी चिपळूण

अरूणाचल प्रदेशातील रोहींग या सीमावर्ती भागात सुमारे 16 हजार फूट उंचीवर भारतीय सैन्यदलाच्या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन विभागात कार्यरत असलेल्या ताम्हणमळा-गवळवाडी येथील जयेंद्र राजाराम तांबडे या 33 वर्षीय जवानाचा सोमवारी सकाळी 8.30 वाजता हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव बुधवारी पहाटेपर्यंत ताम्हणमळा येथे येणार असून त्यानंतर सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गेल्या 11 वर्षापासून सैन्यदलात असलेले तांबडे हे सध्या अरूणाचल प्रदेशातील रोहींग येथे 2628 पायोनियर कंपनी या युनिटमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची प्रत्यक्ष सेवा ही 62 आरसीसी येथे होती. सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तेथील सैन्यदलाच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मंगळवारी त्यांच्यावर युनिटच्यावतीने पुष्पचक्र अर्पण करून त्यांचे पार्थिव आसाम-गुहाटी येथे व त्यानंतर विमानाने मुंबईला आणण्यात आले. मुंबईतून रूग्णवाहिकेतून ताम्हणमळा येथे त्यांचे पार्थिव दाखल होणार आहे.

दहावीनंतर जयेंद्र सैन्यात दाखल

जयेंद्र तांबडे यांचे दहावीपर्यत शिक्षण शिरवली येथील माध्यमिक विद्यालयात झाले. चुलते आणि भाऊ सैन्यात असल्याने ते दहावीनंतर सैन्यात भरती झाले. त्यांना अडीच वर्षांचा अंकीत आणि एक वर्षाची आर्या अशी दोन मुले असून त्यांच्या शिक्षणासाठी पत्नी प्रियांका ही मुलांसह चिपळूण शहरातील वडनाका येथे रहाते. त्यांच्या पश्चात आई. वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

गणेशोत्सवात येणार होते सुट्टीवर

येत्या गणेशोत्सवात जयेंद्र हे गावी येणार होते. त्यासाठी त्यांनी आसाम येथे सैन्यात असलेल्या आपला चुलत भाऊ प्रविण याला संपर्क साधून 27 ऑगस्टचे तिकीट बुकिंग करण्यास सांगितले होते. प्रविण हा सोमवारी सुट्टीवर गावी येण्यास निघाला होता. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला जयेंद्र यांच्या मृत्यूचे वृत्त कळले आणि त्याला धक्काच बसला. गावी जात असल्याचे त्याला समजल्यावर जयेंद्र याने आपणही गणपतीला गावी येणार असून तिकीट बुकिंग करून ठेव, असे सांगत आपल्याशी 32 मिनिटे बोलला असल्याचे प्रविणने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.

तांबडे कुटुंबियांची सैनिकी परंपरा

ताम्हणमळा येथील गवळवाडी ही सुमारे 40 कुटुंबाची वाडी. त्यामध्येच तांबडे कुटुंबांची 15 ते 20 घरे आहेत. या वाडीतून एकूण पाचजण सैन्यदलात आहेत. यातील जयेंद्र यांचे चुलते आत्माराम तांबडे हे निवृत्त झाले आहेत. त्यांचे चिरंजीव रवींद्र हे गेली 23 वर्षे राष्ट्रीय रायफलमध्ये आणि सध्या जम्मूमध्ये, तर प्रविण हे गेल्या पंधरा वर्षापासून सैन्यदलात असून सध्या ते आसाम येथे आहेत. तसेच घरातील चुलते आणि चुलत भाऊ सैन्यात असल्याने जयेंद्र हाही सैन्यात भरती झाला होता. याच वाडीतील शरद मिरगल हाही सैन्यदलात आहे.

दरम्यान, जयेंद्र यांच्या निधनाचे वृत्त कळताच ताम्हणमळा परिसरावर शोककळा पसरली आहे. बुधवारी पहाटेपर्यंत त्यांचे पार्थिव येथे दाखल होणार असून त्यानंतर तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Related posts: