|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अधिकाऱयांना कोंडण्यापेक्षा तुमच्या मंत्र्यांनाच जाब विचारा!

अधिकाऱयांना कोंडण्यापेक्षा तुमच्या मंत्र्यांनाच जाब विचारा! 

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची सत्ताधारी नेत्यांवर टीका

वार्ताहर / कणकवली:

जिल्हय़ात सध्या सत्ताधारी कोण व विरोधक कोण हेच जनतेला समजत नाही. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अधिकाऱयांना घेराव, जाब विचारत कोंडून ठेवत आहेत. मात्र, त्याच खात्याचे मंत्री जनतेला वारेमाप आश्वासने देत आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयांनी अधिकाऱयांना कोंडून ठेवण्यापेक्षा त्यांच्या खात्याच्या मंत्र्यांनाच दिलेल्या आश्वासनाबाबत जाब विचारावा, असा टोला मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी लगावला.

जिल्हय़ातील महामार्गाच्या दूरवस्थेबाबत भाजपने नुकतेच महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱयांना विश्रामगृहावर कोंडून ठेवले होते. या अनुषंगाने कोणाचेही नाव न घेता येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपरकर यांनी सत्ताधाऱयांवर टीका केली. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर उपस्थित होते.

उपरकर म्हणाले, राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हय़ात आल्यावर जनतेला आश्वासने दिली. मात्र, नुकताच सावंतवाडी येथे वीज अधिकाऱयांवर जनतेचा असलेला रोष दिसून आला. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱयांना आपल्या पक्षाच्या मंत्र्यांच्या घोषणेवर विश्वास नसल्याने अधिकाऱयांना जाब विचारण्याची वेळ येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्र्यांनी हायवेच्या कामाबाबत घोषणा केली. आश्वासने दिली. मात्र, त्याच हायवे चौपदरीकरणाच्या ठेकेदाराला भाजप पदाधिकारी कोंडून ठेवत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱयांना कोंडण्यापेक्षा पक्षाच्या मंत्र्यांनाच आश्वासनांचा जाब विचारावा. सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था 1995 ते 1997 कालावधीसारखी झाली आहे. या जीवघेण्या हायवेवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

पोलिसांना सक्षम व्हायला सांगणाऱया गृहराज्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हय़ात पोलीस अधिकाऱयांची अनेक पदे रिक्त आहेत. यात 4 पोलीस निरीक्षक, 10 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 24 पोलीस उपनिरीक्षक, 6 कनिष्ट लिपीक, 6 सफाईगार आदी पदे रिक्त आहेत. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्हय़ातील ही स्थिती दुर्दैवी नाही का? पालकमंत्री जिल्हय़ात असताना कुडाळमध्ये युवासेनेचे पदाधिकारी पोलीस निरीक्षकांना निवेदन देतात, याचा अर्थ पालकमंत्र्यांवर कार्यकर्त्यांचाही विश्वास नाही. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षांच्या मंत्र्यांवर विश्वास नसल्याने अधिकाऱयांकडून कामाची अपेक्षा करतात. त्यामुळे आता मंत्र्यांनी राजीनामे देण्याची मागणी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करावी, असा टोला उपरकर यांनी लगावला.

पालकमंत्र्यांनी हत्तींना रोखण्यासाठी खंदक, सौर कुंपण, 35 लाखाचे फटाके, अभयारण्य आदी उपाययोजना करण्याच्या घोषणा केल्या. मात्र, हत्तींना रोखणे दूरच राहिले. या उलट पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांना गळती लागली आहे. रुग्णालयांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे आताच्या सरकारने जिल्हा 10 वर्षे मागे नेला, अशी टीका उपरकर यांनी केली.