|Friday, March 22, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य

शिक्षणाच्या ज्योतीने प्रज्वलित झाले २५० विद्यार्थ्यांचे आयुष्य 

ऑनलाईन टीम / पुणे :
कधी अतिवृष्टी तर कधी गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यातच शेतक-यांचे संपूर्ण आयुष्य निघून जाते. निसर्गाच्या कोपामुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो. विदर्भ मराठवाडयातील शेकडो गावांमध्ये आजही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील किमान मुलांनी तरी शिक्षण घेऊन मोठे व्हावे, यासाठी  पुण्यातील निरंजन सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. मागील सहा वर्षांपासून संस्थेतर्फे बीडमधील दुष्काळग्रस्त शिरुर कासारमधील अशा मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व घेण्यात येते. यंदा तब्बल २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारुन त्यांचे आयुष्य शिक्षणाच्या ज्योतीने प्रकाशमान केले आहे. 
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे बीड शिरुर कासार येथे झालेल्या कार्यक्रमात शेतक-यांच्या २५० मुलांचे शैक्षणिक पालकत्त्व स्वीकारण्याचा कार्यक्रम पार पडला. उपक्रमाला कासट सिक्युरिटी प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राजेश कासट, ब्रिंटॉन फार्माचे संचालक राहुल दर्डा, अहमदनगर येथील उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी मोठया प्रमाणात सहकार्य केले आहे. विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल यांसह शाळेचा गणवेश, बूट आदी वर्षभर लागणारे सर्व साहित्य संस्थेतर्फे देण्यात आले. 
राजेश कासट म्हणाले, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबातील मुलांना अनेकदा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेणे शक्य होत नाही. या मुलांनी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी संस्थेने सुरु केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. 
राहुल दर्डा म्हणाले, ग्रामीण भागात अनेकदा शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना आपण पाहतो. अशा मुलांना शिक्षणासाठी आवश्यक गोष्टी दिल्यास नक्कीच त्यांचे भविष्य उज्वल होईल. तसेच इतरांनी देखील आपल्या समाजात कोणी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करायला हवे. 
पालकत्त्व योजनेतील शिवकन्या मिसाळ ही विद्यार्थीनी म्हणाली, माझ्या वडिलांचा मृत्यु झाल्यामुळे माझी आईवर कुटुंबाची जबाबदारी आली. त्यामुळे खूप ताण पडत होता. परंतु संस्थेने राबविलेल्या या उपक्रमाचा माझ्यासारख्या मुला-मुलींना नक्कीच फायदा होणार आहे. शिक्षणासाठी आवश्यक सगळ्या गोष्टी संस्थेने उपलब्ध करून दिल्याने आम्हाला आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बळ मिळाले आहे. यातून आम्ही खूप शिकून मोठे होऊ, उच्च पदावर जाऊ असा विश्वास आहे.
बीडसह मुळशीतील नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील पालकत्त्व योजना
केवळ पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाºया या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारी सर्व मदत संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांच्या पालकत्वापासून प्रारंभ करण्यात आलेल्या या उपक्रमाची व्याप्ती वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी १५४ शालेय विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक पालकत्व संस्थेने घेतले होते. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील २०० गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. तर, मागील वर्षी २२२ मुलांचे पालकत्त्व संस्थेने स्वीकारले होते. यावर्षी २५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. बीडसह मुळशी नांदगाव, रायगड आणि अहमदनगरमध्ये देखील हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे. 

Related posts: