|Friday, May 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सन्मित्राची लक्षणे

सन्मित्राची लक्षणे 

पापान्निवारयति योजयते हितायं

गुहय़ानि गूहति गुणान् प्रकटीकरोति ।

आपद्गतं च न जहाति ददाति काले

सन्मित्रलक्षणमिदं ‘प्रवदन्ति सन्तः ।।

अन्वय-

(मित्रं) पापात् निवारयति, हिताय (च)

योजयते । (मित्रस्य) गुहय़ानि गूहति (तस्य)

गुणान् (च) प्रकटीकरोति । आपद् गतं च

तं न जहाति (अपि तू) (योग्य) काले

ददाति । इदं सन्मित्रलक्षणम् (इति)

सन्तः प्रवदन्ति ।

अनुवाद-

(मित्र) दुराचरणापासून रोखतो, हितकारक गोष्टीची योजना करतो, गुपितं लपवितो, गुणांना (मात्र इतर लोकांपुढे) उघड करतो. संकटात सापडलेल्याला (मित्राला) सोडून जात नाही. तर योग्य काळी त्याला (आवश्यक ती) मदतही देतो. हे चांगल्या मित्राचे लक्षण आहे असे सज्जनांनी सांगितले आहे.

विवचेन- माणसाची बहुतेक नाती ही जन्माने ठरतात. अपवाद दोन. पत्नीचे नाते आणि मित्राचे नाते. या दोन बाबतीत तो निवड करू शकतो. म्हणजे त्याला त्यामध्ये पर्याय उपलब्ध असतो. (पत्नी चांगली निघणे ही लॉटरीच असते असे काही जण म्हणतात!) मित्र निवडताना मात्र आपण विशेष सावधपणा ठेवून पारख केली पाहिजे. स्वार्थासाठी मैत्री जोडणारे, तसेच तोंडावर गोड बोलणे, आपल्या परोक्ष कार्यनाश करणारे खूप असतात. त्यांना टाळलेच पाहिजे. ते तोंडाशी दूध असलेल्या विषकुंभासारखच असतात-

परोक्षे कार्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम् ।

वर्जयेत् तादृशं मित्रं विषकुंभ पयोमुखम् ।।

आता चांगला मित्र कसा निवडावा? त्यासाठी सुभाषितकाराने सन्मित्राची लक्षणेच दिली आहेत. पहिल्या प्रथम असा मित्र आपणास वाईट वागूच देत नाही. आपले पाऊल वाकडे पडण्याचा संभव जरी दिसला तरी तो खडसावून योग्य मार्गावर आणतो तसेच आपल्यासाठी हितकर गोष्टींची तो योजनाही करतो. आपली काही गुपिते असतात (ती अडचणीत आणू शकतात) खरा मित्र आवर्जून इतरांपुढे प्रकट करतो. संकटात सापडलेल्या मित्राला सोडून जात नाही. ही फार मोठी किंबहुना सर्वात मोठी कसोटी आहे. तर अशावेळी खंबीरपणे पाठीशी राहून (आवश्यक ती) मदतही करतो. ही सज्जनांनी सांगितलेली सन्मित्राची लक्षणे आहेत. त्यानुसार पारख करून जर आपण मित्र जोडले तर कधीही पश्चातापाची पाळी येणार नाही आणि जीवन सुखमय होईल यात शंका नाही.

Related posts: