|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » काँग्रेस 45 तर राष्ट्रवादीला 33 जागा शक्य

काँग्रेस 45 तर राष्ट्रवादीला 33 जागा शक्य 

प्रतिनिधी /सांगली:

महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसने आघाडीच्या दृष्टीने पावले टाकली असून काँग्रेसने अधिकच्या जागांवर दावा केला असला तरी काँग्रेस 45 आणि राष्ट्रवादी 33 जागांवर तडजोड होण्याची शक्यता आहे. याला एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला. दरम्यान, आघाडीत काही जागांवर मतभेद असून यावर दोन्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांमध्ये चर्चा होऊन मार्ग काढला जाणार असल्याचेही सांगण्यात आले.

भाजपाला रोखण्यासाठी मनपा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने आघाडी करावी, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुरूवातीपासून आघाडीसाठी आग्रह धरला. त्यानुसार दोन्ही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. प्रथम राष्ट्रवादीने 78 पैकी तब्बल 43 जागा सोडण्याची मागणीचा प्रस्ताव काँग्रेसला दिला होता. राष्ट्रवादीने गत निवडणुकीत जिंकलेल्या जागांच्या जवळपास दुपटीने जागा मागितल्याने काँग्रेस नेते खडबडून जागे झाले. त्यांची बैठक झाली. बैठकीतील चर्चेनंतर काँग्रेसनेही राष्ट्रवादीला तब्बल 58 जागांचा प्रस्ताव दिला.

 या प्रस्तावानुसार राष्ट्रवादीने फक्त 20 जागा लढवाव्यात, अशी भूमिका मांडली आहे. दोन्ही काँग्रेसच्या या प्रस्तावनंतर दोन्ही बाजूंनी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. खास करून राष्ट्रवादीने काँग्रेसचा हा प्रस्ताव धुडकावून लावला असून ताकदीनुसार जागा न सोडल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. असे असले तरी दोन्ही काँग्रेसमध्ये काही जागांवरून मतभेद आहेत. हा चेंडू दोन्ही काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे गेला आहे. नागपूर येथील अधिवेशनाला नेते गेल्याने स्थानिक पदाधिकारीही नागपुरात दाखल झाले आहेत.