|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दोन्ही जिल्हा इस्पितळात आता खाजगी आयसीयु

दोन्ही जिल्हा इस्पितळात आता खाजगी आयसीयु 

प्रतिनिधी/ पणजी

दोन्ही जिल्हा इस्पितळे तसेच इतर ठिकाणी असलेल्या उपजिल्हा इस्पितळात खासगी तत्त्वावर आयसीयु (अतिदक्षता विभाग) सुरु करण्यात येणार असून गोमेकॉत नवीन 36 डॉक्टर्सची भरती केल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की म्हापसा व मडगाव येथील जिल्हा इस्पितळ तसेच फोंडा, वाळपई, डिचोली इत्यादी ठिकाणी आयसीयु विभाग सुरु करण्याचे ठरवण्यात आले आहे. शिवाय गोमेकॉत मानसोपचार विभाग मेंटल केअर युनिट) चालू करण्याचेही निश्चित झाले आहे. उसगाव व बाणावली येथे नवीन आरोग्य केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आखण्यात आला असून अनेक आरोग्य अधिकाऱयांना पदोन्नती व बढती देण्यासाठी प्रक्रिया चालू झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

108 सेवेच्या ताफ्यात वाढ

राणे म्हणाले की 108 रुग्ण्वाहिका सेवेच्या ताफ्यात येत्या 10 जुलै रोजी 7 चारचाकी तर येत्या 15 ऑगस्ट रोजी नवीन दुचाकी रुग्णवाहिकांचा समावेश केला जाणार आहे. अवयव रोपणाचे काम करण्यासाठी स्पेन देशातून खास डॉक्टर्स मागवण्यात आले असून ते गोमेकॉत सेवा देणार आहेत. सांखळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून त्याचे कम्युनिटी आरोग्य केंद्रात परिवर्तन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विविध सेवा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

दिनदयाळ सामाजिक स्वास्थ्य सुरक्षा विमा योजनेबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी सोमवारी बैठक घेण्यात येणार असून त्यावेळी त्यात कोणते बदल किंवा सुधारणा करण्याबाबत चर्चा होणार आहे. सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा गोव्यात विविध ठिकाणी उपलब्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लोकांना त्यासाठी गोव्याबाहेर जावे लागू नये, अशी अपेक्षा आहे.