|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ..तर ‘शाहू’चे मोळी पूजन वाजत-गाजत येवून करू

..तर ‘शाहू’चे मोळी पूजन वाजत-गाजत येवून करू 

प्रतिनिधी\ कागल

ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार असे कोणतेही पद नसताना शासकीय कामांची उद्घाटने करण्याची घुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणाऱयांना घाई लागली आहे. ‘वेडय़ा बाईला सासर की माहेर’ हे समजणार नसेल आणि तालुक्यात धार-धार संघर्ष होण्याची वाट बघणारच असाल तर मीही छ. शाहू सहकारी साखर कारखान्याचा संस्थापक संचालक व शेतकरी सभासद आहे, येत्या गळीत हंगामातील मोळीचे पूजन वाजत गाजत येवून करू असा सज्जड इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना दिला. 

येथील शाहू हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात आमदार हसन   मुश्रीफ बोलत होते. माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वा. पाटील, सरचिटणीस अनिल साळोखे, युवराज पाटील, राष्ट्रवादीचे युवा          प्रदेशउपाध्यक्ष नविद मुश्रीफ, गणपतराव फराकटे, पंचायत समिती सभापती सौ. राजश्री माने, कृष्णात पाटील, प्रकाशराव गाडेकर, जि. प. सदस्य मनोज फराकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राजकारणात कांही प्रोटोकॉल असतात, ते पाळायचे असतात असा सल्ला पत्रकार परिषद घेवून यापूर्वीच आमदार मुश्रीफ यांनी दिला होता. पण समरजितसिंह घाटगे यांनी लोकांच्यासाठी असे प्रोटोकॉल मोडू असे उत्तर दिले होते. अशा अनेक संदर्भांचा समाचार घेत फर्डा इशारा देत आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, ‘आपल्याला कागलच्या स्वाभिमानी जनतेने चार वेळा आमदार केले आहे. गोरगरीबांच्या आशिर्वादाने राज्याच्या मंत्रीमंडळात चौदा वर्षे मंत्री म्हणूनही काम करता आले. पण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असणारे शांततेने सुरू असलेल्या तालुक्यात संघर्ष करू पाहत आहेत. आलाबाद येथील ओढय़ावर मागासवर्गीय विशेष घटक योजनेतून सिमेंट काँक्रीट नाला बांधासाठी निधी मंजूर झाला. त्याचे काम पूर्ण झाले आहे, तेथील सरपंच, पदाधिकारी यांना न बोलावता पाणी पूजन आजच उरकले. इतकी घाई विरोधकांना कशासाठी? असा सवाल करून आमदार मुश्रीफ म्हणाले, स्व. सदाशिवराव मंडलिक आमदार असताना कागलला एसटी बस स्थानक इमारत मंजूर होवून त्याचे काम पूर्ण झाले होते, पण त्याचे उद्घाटन त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते व विक्रमसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार होते. तालुक्याचे आमदार असताना मंडलिक यांचे कार्यक्रम पत्रिकेत फक्त उपस्थितीतामध्ये नाव होते. त्यांचा स्वाभिमान दुखावला आणि संघर्ष पेटला, दगड फेकीपर्यंत प्रकरणे गेले होते. त्याची आठवणही आमदार हसन मुश्रीफ यांनी यावेळी करून दिली.

विधानसभा निवडणूक ही नियमाप्रमाणे झाली तर फक्त तेरा महिने बाकी आहेत. जर लोकसभा निवडणूकीबरोबर घेतली तर सहा ते सातच महिने कालावधी बाकी आहे, त्यामुळे विधानसभेचे बिगुल वाजल्याचे सांगून कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे अशा स्पष्ट शब्दात सुचना कार्यकर्त्यांना सुचना दिल्या. स्वागत विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक शिवानंद माळी यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, अनिल साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले.

संजय गांधी पेन्शनचा बोजवारा…

संजय गांधी निराधारसारख्या योजना आपण प्रभावीपणे राबवल्याने तालुक्यातील 21 हजार गोरगरीबांना याचा फायदा झाला. या लोकांना बँकेतून पेन्शन मिळत होती. नंतर आपण या लोकांसाठी घरी देवू लागलो. आपली सत्ता गेल्यानंतर मात्र विरोधकांनी या योजनेचा बोजवारा करून टाकला. आयसीआयसी बँकेतून काही दिवस पेन्शन मिळत होती, तिथे त्या लोकांनी भ्रष्टाचार केला. पुन्हा केडीसी, परत आयसीआयसी बँक असे इकडून तिकडे सुरू झाले आता त्या बँकेने पेन्शनचे काम आपल्याकडे नको असे सांगीतले आहे. सत्ता बदलल्यानंतर तालुक्यात सुरवातीला शिवसेनेकडे समिती, त्यानंतर दुसरे प्रयत्न करू लागले, मग समझोता होवून कांही भाजपचे सदस्य कमिटीत. आता वरूनच सांगीतले आहे, दोघं एकत्र या. (समरजितसिंह घाटगे आणि संजयबाबा घाटगे) पण या पेन्शन फक्त आपणच केल्या आहेत, हे सर्वांना माहित आहे. या दोघांच्या भांडणात चार-चार महिने पेन्शन मिळेना झाली आहे, असा टोलाही आमदार मुश्रीफ यांनी लगावला.

‘गोकुळ’साठी 15 लाख

सध्या गोकुळ दूध संघामध्ये नोकर भरती करावयाची आहे. त्यातील एका नोकरीसाठी 15 लाखाचा दर काढला असल्याचा गौप्यस्फोट आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. आयुष्यभर एखादा कार्यकर्ता पाठराखण करीत असतो, पण त्याच्या मुलाला नोकरीसाठी घेताना एवढी मोठी लाच मागीतली जाते. अशी लाच मागणाऱयांना जोडय़ानेच हाणले पाहिजे की नाही, असा सवाल करून आमदार   मुश्रीफ म्हणाले, आता तेथीलही सर्व बाहेर येत आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडे ते काम सोपवले असल्याचे सांगीतले. आपण मात्र हजारो मुलांना एक रूपयाही न घेता नोकऱया दिल्या आहेत, याचा उल्लेख त्यांनी केला.

Related posts: