|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात 

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

महाबळेश्वरमधील अंबिका, नामदेव सोसायटीकडे जाणाऱया रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून नागरिकांना ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबराबेर गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावरून ड्रेनेजचे पाणी वाहत असून याच पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. पालिका या रस्त्याच्या डागडुजीकडे सोईस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतून होत आहे.

महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा अंबिका व नामदेव या दोन सोसायटय़ांकडे जाणाऱया रस्त्याची अवस्था अतिशय दयनिय झाली आहे. तीव्र उतार असलेल्या या रस्त्यावरून स्थानिकांना ये-जा करताना अनेक अडथळ्यांची शर्यतच पार करावी लागत आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून एसटीपी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तीव्र उतार असल्याने पावसाच्या पाण्याच्या मोठय़ा प्रवाहासोबत मैला, इतर घाण रस्त्यावरून वाहते, तसेच वाहत असलेल्या पाण्यातूनच स्थानिक नागरिकांना ये-जा करावी  लागत आहे. प्रचंड दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्त आहे.

 स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करून देखील दरवेळी पालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र कोणत्याही ठोस, कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येत नसल्याने स्थानिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या दहा वर्षांपासून रस्त्याच्या डागडुजी देखील व्यवस्थित करण्यात येत नसून चांगल्या दर्जाचा रस्ता मिळावा अशी माफक अपेक्षा स्थानिकांची आहे. पालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील याकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

Related posts: