|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुर्लात मद्यपी पर्यटकांकडून धांगडधिंगाणा

सुर्लात मद्यपी पर्यटकांकडून धांगडधिंगाणा 

प्रतिनिधी/ वाळपई

गोव्याचे माथेरान म्हणून समजल्या जाणाऱया सत्तरी तालुक्यातील सुर्ल गावामध्ये कर्नाटकी नागरिकांकडून दिवसेंदिवस वाढणाऱया हुल्लडबाजीविरोधात येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवसात या भागात कर्नाटकातील पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होतात. दारु व मटणाच्या पाटर्य़ा करून ते धांगडधिंगाणा घालत असून त्याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अशा दंगेखोर पर्यटकांना रोखण्यासाठी येथील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सत्तरी तालुक्यातील गोवा कर्नाटक दरम्यानच्या सीमेवरील सुर्ल गावातील निसर्गाचे आकर्षण पर्यटकांना आहे. पावसाळय़ात येथील निसर्ग अधिक खुलत असून कर्नाटकच्या सीमेवरील बेळगाव, जांबोटी आदी भागातील लोक दारु पिण्याच्या उद्देशाने या भागात दाखल होतात. या मद्यपींकडून वारंवार गावची शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेल्या सडा भागात असे पर्यटक मोठय़ा संख्येने दाखल होतात व मद्यपान करून हुल्लडबाजी करतात. अशा प्रकारांमुळे या भागातील सुरक्षेचा प्रश्न बिकट बनत आहे. महिला व मुलींनाही त्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या हुल्लडबाज पर्यटकांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

असे गैरप्रकार रोखण्यासाठी काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक आज रविवार 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता येथील  देवस्थानच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.

Related posts: