|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » चौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा

चौपदरीकरण करणाऱया एजन्सींना नोटिसा 

कामात सुधारणा करा : नागरिकांच्या संतापानंतर महामार्ग प्राधिकरणला जाग : अनेक ठिकाणी महामार्ग बनलाय अपघातग्रस्त : चतुर्थीपूर्वी हायवेची स्थिती सुधारणार काय?

दिगंबर वालावलकर / कणकवली:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात महामार्ग चौपदरीकरणाचे काम एकीकडे सुरू असताना हायवेच्या दिलीप बिल्डकॉन व केसीसी बिल्डकॉन एजन्सीकडून कामात होत असलेली दिरंगाई व कामाबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी या पार्श्वभूमीवर हायवेच्या जिल्हय़ातील या दोन्ही एजन्सींना महामार्ग प्राधिकरणकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत. ‘हायवेच्या सध्या सुरू असलेल्या कामात सुधारणा करा’ असे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, हायवेची सध्या झालेली जीवघेणी स्थिती पाहता, केवळ नोटीस देऊन पाहत राहणे म्हणजे कागदी घोडे नाचविण्यासारखे आहे.

महामार्गाच्या एजन्सीने कामात दिरंगाई केल्यास एजन्सीला दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दिला होता. हायवेचे काम निकृष्ट झाले, तर ठेकेदारावर कठोर कारवाईचाही इशारा मंत्रीमहोदयांनी एका कार्यक्रमात दिला होता. असे इशारे दिले जात असताना मात्र  जिल्हय़ात हायवेच्या दूरवस्थेबाबत सर्व काही आलबेल असल्यासारखी प्रशासनात स्थिती आहे. त्यामुळे आता नागरिकांनाच रस्त्यावर उतरून आपल्या मागण्यांसाठी लढा द्यावा लागत आहे. मात्र, त्याचीही पूर्तता अद्याप तरी होताना दिसत नाही.

ओसरगाव : चौपदरीकरणांतर्गत बांधण्यात आलेल्या मोऱयांच्या पाईपचा मातीचा भराव वाहून जात पाईप उघडे आहेत. येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा हा एक नमुना. पप्पू निमणकर

एक ते दोन फुटाचे खड्डे

महामार्गाला सध्या खड्डय़ांचे ग्रहण लागले असून गेली दोन वर्षे जिल्हय़ातील हायवेच्या खड्डय़ांबाबत केवळ आश्वासनांच्या पलिकडे यावर उपाययोजना होत नाहीत. खारेपाटण ते कलमठपर्यंत अनेक ठिकाणी जुन्या महामार्गाला सुमारे एक ते दोन फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्यासाठी महामार्ग प्राधिकरण किंवा केसीसी बिल्डकॉन या काम घेतलेल्या एजन्सीकडून कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. ज्या ठिकाणी ग्रामस्थांचा रोष आहे, तेथे तात्पुरती मलमपट्टी करण्याव्यतिरिक्त काम केले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये एजन्सीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हायवेच्या या प्रश्नावर या भागातील नागरिकांना व हायवेवरून वाहने चालविणाऱया वाहन चालकांना कुणी वालीच नाही, अशी सध्याची स्थिती आहे.

ओसरगावमध्ये समस्यांचा डोंगर

कणकवलीतील जानवली पुलापासून ते झारापपर्यंतचे काम दिलीप बिल्डकॉन या एजन्सीकडे आहे. ओसरगावमधील सर्वात जास्त जागा चौपदरीकरणात बाधीत होत आहेत. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डय़ांमध्ये साचलेले पाणी खड्डय़ांच्या तिव्रतेची जाणीव करून देत नाही. त्यामुळे या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. ओसरगाव व कासार्डे आदी काही ठिकाणी नवीन महामार्गाचे काही काम पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. नवीन रस्त्यांवर येण्यापूर्वी जेथे पर्यायी मार्ग ठेवण्यात आले आहेत, तेथे कोणत्याही खबरदारीच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे रात्रीच्यावेळी महामार्गावरून ये-जा करणाऱया वाहन चालकांना धोका पत्करतच वाहने हाकावी लागत आहेत. या भागातील ग्रामस्थ अनेकदा रस्त्यांवर येत आपल्या मागण्यांसाठी प्रशासनाशी झगडत आहेत. मात्र, या साऱयांवर केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आता न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.

उद्रेक होण्याची शक्यता

जूनपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी महामार्गावर नवीन रस्त्यासाठी केलेल्या भरावाची माती वाहून येण्याचे प्रसंग घडले. महामार्ग प्राधिकरणने ही माती रस्त्यावर येऊ नये म्हणून मातीने भरलेल्या सिमेंटच्या पिशव्या भरून ठेवण्याच्या सूचना एजन्सीला दिल्या. मात्र, हा सारा प्रकार म्हणजे उंटावरून शेळ्य़ा हाकण्यासारखे आहे. एजन्सीला सूचना दिल्यानंतर संपूर्ण महामार्गावर ठराविक ठिकाणीच अशा पिशव्या माती वाहून रस्त्यावर येऊ नये म्हणून ठेवण्यात आल्या. मात्र, उर्वरित ठिकाणी येणाऱया मातीचे काय? तेथे त्यामुळे अपघात घडणार नाहीत, याची हमी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत हायवेच्या अधिकाऱयांना विचारणा केल्यावर आम्ही बघतो, करून घेतो, असे साचेबद्ध उत्तर अधिकाऱयांकडून येत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गणपती पावणार काय?

गणेश चतुर्थीत महामार्गावर कोकणात येणाऱया वाहनांमध्ये मोठी वाढ होणार आहे. 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून या कालावधीत महामार्गाची सध्याची स्थिती राहिल्यास अपघातांचे सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी पर्यायी मार्गांच्या ठिकाणी स्पष्ट दिसण्यासारखे दिशादर्शक फलक लावलेले नाहीत. अशा स्थितीत मुंबईहून येणाऱया वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघात घडून चतुर्थीपूर्वीच प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे चतुर्थीपूर्वी रस्ते सुस्थितीत येण्यासाठी जणू वाहनधारक गजाननाला साकडे घालत आहेत. याबाबत एजन्सी किंवा प्रशासन गांभिर्याने घेत नसल्याचे दिसते.

आता भाजपचे पदाधिकारी काय करणार?

गतवर्षी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सिंधुदुर्गातील महामार्गाच्या खड्डय़ांची पाहणी करण्याकरिता जिल्हा दौरा केला होता. या दौऱयात व दौऱयापूर्वी हायवेचे खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आल्याचे दाखविण्यात आले. मात्र, बांधकाममंत्री गगनबावडा मार्गे कोल्हापूरला पोहोचेपर्यंतच भरलेले खड्डे पुन्हा उखडले होते. यावर्षी हायवेची स्थिती गतवर्षीपेक्षा बिकट आहे. अशावेळी बांधकाममंत्री आता नव्याने काय आश्वासन देणार, असा संतप्त सवाल केला जात आहे. त्यावेळी हे खड्डे बुजविल्यानंतर भाजप पदाधिकाऱयांनी बुजविलेल्या खड्डय़ांचे फोटो सेशन करीत त्याचा ‘सचित्र’ अहवाल बांधकाममंत्र्यांना पाठविलेला होता. मात्र, आता सत्तेत सहभागी असलेले भाजपचे ते पदाधिकारीही गप्पच असल्याने यावर्षी महामार्गाची व पर्यायाने प्रवाशांची सुरक्षितता कोण पाहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.