|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शेती पाण्यासाठी 12 तास वीज द्या

शेती पाण्यासाठी 12 तास वीज द्या 

वार्ताहर/   कागवाड

कर्नाटक शासनाने कर्जमाफी करण्याचा फेरविचार करुन शेतकऱयांचे सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफ करावे, शेतकऱयांना दररोज 12 तास थ्री फेज वीजपुरवठा करावा, 2017-18 च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादकांना थकीत बिले कारखानदारांना त्वरित देण्याचे आदेश द्यावेत, पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याने कागवाड तालुका दुष्काळी जाहीर करावा, या मागण्यांचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुभाष कठारे यांच्या नेतृत्त्वाखाली कागवाड येथील शेतकऱयांनी मोर्चाद्वारे तहसीलदारांना दिले.

निवेदनात, 5 जुलै रोजी कर्नाटकातील संमिश्र सरकारने शेतकऱयांची थकीत पीक कर्ज दोन लाखापर्यंत माफ केले. त्याचा लाभ शेतकऱयांना झालेला नाही. या विषयावर फेरविचार करुन सरकारने सरसकट दोन लाखाची कर्जमाफीची तरतुद करावी. पाऊस नसल्याने दुष्काळीस्थिती आहे, पावसाअभावी खरीप वाया जात आहे. हे लक्षात घेता कागवाड दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली.

सदर निवेदन कागवाड तहसीलदार कार्यालयाचे प्रतिनिधी शिरस्तेदार एम. आर. पाटील व महसूल अधिकारी बी. बी. बोरगल यांच्याकडे देण्यात आले. यावेळी एम. बी. उदगावी, अरुण जोशी, शशिकांत जोशी, राजेंद्र चिंचवडे, काका चौगुले, डी. के. खोडे, प्रकाश चौगुले, शंकर माळी, धोंडिराम मसके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.