|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘प्लास्टीक इंडस्ट्री’ धोक्यात?

‘प्लास्टीक इंडस्ट्री’ धोक्यात? 

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील 17 उद्योगांना नोटीस -प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई

बंदीच्या पार्श्वभूमीवर मोहीम

राजेंद्र शिंदे /चिपळूण

बेसुमार वापरामुळे पर्यावरणासह जीवसृष्टीला घातक ठरलेल्या प्लास्टीकच्या वापरावर राज्य सरकारने बंदी घातल्यानंतर प्लास्टीक उत्पादन करणाऱया उद्योगांवर गंडांतर आले आहे. बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टीक उद्योगांची तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत रत्नागिरी जिह्यातील 11, तर सिंधुदुर्ग जिह्यातील 6 अशा एकूण 17 कारखान्यांना प्रस्तावित आदेशाच्या नोटीसा बजावल्या आहेत.

शासनाने अलिकडेच राज्यात प्लास्टीक व थर्मोकोल बंदी जाहीर केली. थर्मोकोल तसेच प्लास्टीक पिशव्यांचा (कॅरीबॅग) वापर करणाऱया दुकानदारांबरोबरच नागरिकांकडूनही पहिल्यावेळी नियमभंग केल्यास 5 हजार रूपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर या दंडाच्या रकमेत 10 हजार रूपये व 25 हजार रुपये अशी वाढ होणार आहे. प्रसंगी गुन्हा दाखल करण्याची तरतूदही यामध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हय़ात प्लास्टीकचे उत्पादन करणाऱया उद्योगांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तपासणी करण्यात येत आहे. प्लास्टीक बंदीबाबत शासनाने नव्याने दिलेल्या सूचना आणि त्यांची अंमलबजावणी उत्पादन करणाऱया कारखान्यांना बंधनकारक आहे. त्या दृष्टीने मंडळाच्या अधिकाऱयांकडून या उद्योगांची तपासणी करून त्या दृष्टीने आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना प्रस्तावित आदेश काढून 15 दिवसांत आपले म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाने केलेल्या तपासणीत रत्नागिरीतील जीएमजी फुडस् ऍण्ड बेव्हरेज, ताम्हणकर इंडस्ट्रीज, डी. के. टेक्नॉलॉजी, नैवेद्यम डायनिंग प्रा. लि., खेर्डी एमआयडीसीतील मल्टीफिल्म प्लास्टीक प्रा. लि.चे दोन्ही उद्योग, मिस्टीकल टेक प्लास्टीक प्रा. लि., तसेच लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री स्वामी इंडस्ट्रीज आणि गाणेखडपोली एमआयडीसीतील आशू प्लास्टीक इंडस्ट्रीज अशा सहा युनिटना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रस्तावित आदेशाबाबतच्या नोटीस दिल्या आहेत. यामध्ये प्लास्टीक कारखान्यांवर बंदीची कारवाई का करू नये, असे या नोटीसीत विचारण्यात आले आहे. कारखान्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पंधरा दिवसांच्या मुदत देण्यात आली असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

दरम्यान, सिंधुदुर्गातील कुडाळ येथील श्री ऍक्वा प्युरीफायर प्रा. लि., कणकवली येथील भद्रकाली मिनरल वॉटर इंडस्ट्रीज, जाधव बेव्हरेज प्रा. लि., इपिक्युअर फुडस् ऍण्ड बेव्हरेज, वैभववाडी येथील श्री स्वामी समर्थ फुडस् यांनाही नोटीस देण्यात आल्या आहेत.

Related posts: