|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू

टेम्पो दरीत कोसळून दोघांचा मृत्यू 

खंबाटकी घाटातील घटना : मृत दोघे कोलगाव, कारिवडे येथील : एक जखमी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

सावंतवाडीहून मुंबईतील भिवंडी येथे वेफर्ससाठी केळी घेऊन जाणारा आयशर टेम्पो सातारा खंबाटकी बोगद्याच्या उतारावर मंगळवारी पहाटे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. यात सावंतवाडीतील दोघेजण जागीच मृत्युमुखी पडले, तर अन्य एक गंभीर जखमी झाला. गजानन लक्ष्मण राणे (42, रा. कोलगाव) व हर्षवर्धन अच्युत गावडे (26, रा. कारिवडे) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. स्वप्नील लातये (25, माडखोल) असे गंभीर जखमीचे नाव आहे.

जखमीवर सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राणे, गावडे यांच्या मृत्यूमुळे कोलगाव, कारिवडेवर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजताच कोलगाव, कारिवडे, माडखोल येथील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने साताऱयाला रवाना झाले होते.

कोलगाव येथील गजानन लक्ष्मण राणे हे दोडामार्ग, ओटवणे येथून वेफर्ससाठी लागणारी केळी आयशर टेम्पोत भरून भिवंडी येथे जात होते. सोमवारी सायंकाळी ते सावंतवाडीहून निघाले होते. त्यांच्यासोबत टेम्पोत कारिवडे येथील हर्षवर्धन गावडे आणि क्लिनर म्हणून स्वप्नील लातये होते. मंगळवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास सातारा जिल्हय़ातील खंडाळा वान्याची वाडी हद्दीत बेंगलोर-मुंबई हायवे रोड क्रमांक चारवर खंबाटकी बोगद्याच्या पुढे व पॅनॉलच्या अलिकडे रस्त्याचा कठडा तोडून हा टेम्पो दोनशे फूट खाली कोसळला. या घटनेत चालक गजानन राणे, हर्षवर्धन गावडे जागीच मृत्युमुखी पडले. क्लिनर स्वप्नील लातये गंभीर जखमी झाले.

अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावर पेट्रोलिंग करणारे पोलीस, स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी लाथये टेम्पोच्या बाहेर फेकले गेले होते. त्यांना सातारा रुग्णालयात दाखल करण्यात आले. लातये यांच्याकडून मृतांची माहिती घेण्यात आली. आयशर टेम्पोचा चक्काचूर झाला होता. गावडे यांच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले होते. अपघाताबाबत खंडाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक महेश कदम तपास करीत आहेत. सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथून सोमवारी सायंकाळी पाच वाजता हा टेम्पो निघाला होता. या टेम्पोसोबत अननस भरलेला टेम्पोही होता. तो पुढे गेला होता.

राजन म्हापसेकर, जीवन केसरकर, सचिन राऊळ, उमेश तेली, संतोष मेस्त्राr, दत्तू ठाकुर, सूर्यकांत राऊळ, गुरुप्रसाद राणे, प्रमोद डेगवेकर, सचिन हळदणकर, विनायक ठाकुर आदींसह मोठय़ा संख्येने ग्रामस्थ साताऱयाला रवाना झाले होते. मृत गजानन राणे कोलगावचे रहिवासी. मुलांच्या शिक्षणानिमित्त त्यांचे कुटुंबीय सावंतवाडी ज्युस्तीन नगरमध्ये राहतात. आयशर टेम्पो राणे यांच्या मालकीचा होता. राणे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, सात वर्षांची मुलगी असा परिवार आहे. तर हर्षवर्धन गावडे यांच्या पश्चात आई, वडिल, बहीण असा परिवार आहे. गावडे चालक म्हणून काम करीत असत. त्यांचे वडिल एस. टी. महामंडळातून सेवानिवृत्त झाले असून रिक्षा व्यवसाय करतात. दरम्यान गजानन राणे व हर्षवर्धन गावडे या दोघांचे मृतदेह मंगळवारी रात्री उशिरा सावंतवाडीत आणून उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात येणार होते. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जि. प. चे माजी सभापती मंगेश तळवणेकर यांनी सांगितले.

Related posts: