|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून पर्यटन विकसित व्हावे…

स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून पर्यटन विकसित व्हावे… 

गोव्यातील खनिज व्यवसाय ठप्प झाला अन् गोव्याचे कंबरडे मोडले. गोव्यावर आर्थिक संकटाचे ढग जमू लागले. त्यातून मार्ग कसा काढावा, हा प्रश्न आजही कायम आहे. खनिज व्यवसायानंतर ‘पर्यटन’ हाच गोव्याचा प्रमुख व्यवसाय…, गोव्याला लाभलेले नैसर्गिक समुद्रकिनारे, येथील मंदिरे, चर्चेस, मशिद, दूधसागर धबधबा ही प्रमुख पर्यटन स्थळे. या पलीकडे जाऊन पर्यटन विकसित करण्याचा गोव्याने अद्याप प्रयत्न केलेला नाही. निदान ‘स्वदेश दर्शन योजने’च्या माध्यमातून पर्यटन विकसित करणे शक्य आहे …

 

केंद्र सरकारने ‘स्वदेश दर्शन योजना’ सुरू केली. या योजनेचा लाभ गोव्याला मिळाला आहे. या योजनेंतर्गत 100 कोटीचा निधी सध्या पर्यटन खात्याला उपलब्ध झाला आहे. तशी माहिती हल्लीच गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर यांनी दक्षिण गोव्यातील कोलवा समुद्रकिनाऱयाच्या सौंदर्यीकरण कामाचा शुभारंभ करताना दिली. 100 कोटी, हा निधी तसा कमी नाही पण या निधीचा नियोजनबद्धरित्या वापर केला तर पर्यटन क्षेत्रासाठी काही ठोस उपक्रम हाती घेणे शक्य आहे.

गोव्याची पर्यटनाची मदार ही येथील फेसाळणारे समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस, मशिद व दूधसागर धबधब्यावर आहे. त्या पलीकडे जाऊन पर्यटन विकसित करण्याची गरज आहे. गोव्याला निर्सगाचा वरदहस्त लाभल्याने या ठिकाणी निसर्ग पर्यटनाला प्रचंड वाव आहे मात्र सरकार दरबारातून आजवर तसा ठोस प्रयत्न झालेला नाही. पावसाळी पर्यटनदेखील म्हणावे तेवढे विकसित झालेले नाही. ते झाल्यास वर्षाचे बाराही महिने पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. पावसाळी पर्यटन हा खूपच महत्त्वाचा ठप्पा ठरू शकतो पण त्यासाठी ठोस कृती करणे आवश्यक आहे.

गोव्यात पर्यटनासाठी येणे पर्यटकांनादेखील सुलभ आहे. पावसाळा संपल्यानंतर विदेशी पर्यटक गोव्यात येतात. पुन्हा पावसाळा सुरू होईपर्यंत या ठिकाणी मुक्काम ठोकतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्वजण परतीच्या प्रवासाला लागतात, असे आजवरचे चित्र आहे. त्यात बदल होणे अपेक्षित आहे. पावसाळय़ात विदेशी पर्यटक कसे येतील, याचा कुठेतरी अभ्यास व्हायला पाहिजे. त्यासाठी उपाययोजना हाती घेणे महत्त्वाचे आहे. विदेशी पर्यटक येतात ते येथील समुद्रात मनसोक्त आंघोळ करून नंतर समुद्रकिनाऱयावर पहुडण्यासाठी. पावसाळय़ात समुद्र खवळलेला असल्याने कुणालाच समुद्रात उतरता येत नाही. त्यामुळे विदेशी पर्यटक गोव्यात येण्याचे टाळतात. समुद्रकिनारे आणि विदेशी पर्यटक हे एक समीकरण झाले आहे. त्यात बदल व्हायला पाहिजे. पावसाळय़ात निर्सग पर्यटनाची संकल्पना राबविल्यास निश्चितच गोव्याला लाभ होईल. विदेशी पर्यटक देखील आवर्जून भेट देतील.

निसर्ग पर्यटनात व खास करून पावसाळय़ात गोव्यातील लहान मोठे धबधबे, कुळागरे, बागायती तसेच येथील लोककला पर्यटकांना भुरळ पाडू शकतात. तसा प्रयत्न होणे आवश्यक आहे. सध्या स्वदेश दर्शन योजनेतून निधी उपलब्ध झालेला आहे. या निधीच्या माध्यमातून निसर्ग पर्यटनाचा मार्ग शोधणे तेवढेच महत्त्वाचे आहे. निसर्ग पर्यटनासाठी निधीची कमतरता भासत असल्यास, केंद्राला तसा प्रस्ताव दिल्यास गोव्याला निश्चितच मदतीचा हात मिळू शकतो पण त्यासाठी हवी जबरदस्त इच्छाशक्ती.

गोव्यातील पर्यटन म्हणजे समुद्रकिनारे, मंदिरे, चर्चेस, मशिद व दूधसागर धबधबा ही जी मर्यादित क्षेत्रे आहेत ती पार करून जाण्याची खऱया अर्थाने गरज आहे. येथील लोककला, लोकनृत्य, शेती-बागायती, कुळागरे इत्यादींच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे शक्य आहे. विदेशी पर्यटकांबरोबरच देशी पर्यटकदेखील गोव्यात येतील, अशी व्यवस्था व्हायला पाहिजे. त्यांच्यासाठी हॉटेलमधील मुक्कामापासून खाणे-पिणे, प्रवास इत्यादी पॅकेजिस पर्यटन महामंडळाने तयार करणे गरजेचे आहे. सध्या देशी पर्यटक पावसाळय़ात गोव्याला भेट देतात पण हे प्रमाण म्हणावे तेवढे समाधानकारक निश्चितच नाही. अनेक देशी पर्यटक हे केवळ दारू पिऊन धिंगाणा घालण्यासाठी येतात. हल्लीच काही पर्यटक गोव्यातील समुद्रात बडून मृत्यू पावल्याची दुर्घटना घडली. गोव्यातील पर्यटन म्हणजे ‘खा, प्या, मजा करा’ असा समज झालेला आहे. त्यात कुठेतरी बदल करायला पाहिजे. खा, प्या, मजा करा याच्या पलीकडेदेखील गोव्यात पर्यटन आहे, हे सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. पर्यटन खात्यालादेखील काही पर्यटन स्थळे नव्याने विकसित करावी लागणार आहेत. शिवाय सध्या उपलब्ध आहे, त्या पर्यटन स्थळांवर साधन सुविधा उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. पर्यटन महामंडळाने पर्यटकांसाठी अनेक कुटिरे उपलब्ध केली आहेत पण त्यांची परिस्थिती बरीच वाईट झालेली आहे. त्यात सुधारणा अपेक्षित आहे. एकाचवेळी हे शिवधनुष्य पेलणे कठीण असले तरी कुठे तरी सुरुवात व्हायला पाहिजे. निदान आत्ता सुरुवात झाली तर आगामी काळात अनेक गोष्टी मार्गी लागलेल्या पहावयास मिळतील, हे नक्की…

महेश कोनेकर

Related posts: