|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दोन पिढय़ांचे झिजले जोडे … वीज मिळेना पडले कोडे!

दोन पिढय़ांचे झिजले जोडे … वीज मिळेना पडले कोडे! 

तामसतीर्थ येथील उर्मिला आजींची 65 वर्षे फरफट

20 फुटांवरून वीजेच्या आजींना वाकुल्या

शासनाचा ‘लख्ख प्रकाश’ कागदावरच

 

मनोज पवार /दापोली

महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वीज पोहचल्याचा दावा शासन करत आहे. मात्र तालुक्यातील तामसतीर्थ येथील राज्य महामार्गालगत असणाऱया उर्मिला शेवडे या आजीबाईंनी अनेक प्रयत्न करूनही त्यांच्या घरी गेली 65 वर्षे वीज पोहोचलेली नाही. वीज मिळवण्यासाठी आईने सुरु केलेली पायपीट त्यांची मुलगी 65 वर्षांची होऊनही संपण्याची चिन्हे दिसत नसल्याच्या प्रकाराने अनेकांना सुन्न करून सोडले आहे.

करजगाव-तामसतीर्थ गुप ग्रामपंचायत आहे. तामसतीर्थ गावात उर्मिला शेवडे या गेली 65 वर्षे स्वतःच्या घरात वास्तव्य करून आहेत. हे घर त्यांच्या आई शालिनी यांनी बांधल्याचे त्या सांगतात. त्यांच्या आईचे 27 वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या आईने त्यांच्या घरी वीज जोडणी मिळावी म्हणून त्यांच्या हयातीत बरेच प्रयत्न केले. मात्र त्यांना यात यश आले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर उर्मिला शेवडे यांनीदेखील घरी वीज जोडणी मिळावी म्हणून चप्पल झिजवल्या. त्यांच्या पदरीदेखील आश्वासनांशिवाय काहीच पडले नाही.

दोन वर्षे वायरिंग वीजेची वाट पाहतेय

2016 साली वीज जोडणीसाठी त्यांनी शेवटचा प्रयत्न करून पाहिला. यावेळी त्यांना घरातील वायरिंग करून घेण्यास सांगण्यात आले. त्यांनी उसनवारीवर पैसे घेऊन घरात आवश्यक वायरिंग करून घेतले. मात्र या गोष्टीला दोन वर्षे लोटली तरी अद्याप वीज जोडणी मात्र पोहचलेली नाही. वास्तविक त्यांच्या घरालगत केवळ 20 फुटावर असणाऱया दुसऱया घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मात्र उर्मिला आजींना केवळ आश्वासने देण्यात आली आहेत.

आश्वासने अन् फसवणूक

आता उर्मिला आजींचं वय 65च्या आसपास आहे. त्यांनी आपल्या हयातीत घरात वीज पुरवठा सुरू होईल ही आशा सोडून दिली आहे. त्यांना अनेकांनी आजवर वीज जोडणी देण्याबाबत केवळ तोंडी आश्वासने दिली. एका महाभागाने तर त्यांच्याकडून तब्बल 7 हजार रूपये घेऊन वीज जोडणी करून देतो असे सांगून पैसे उकळले. मात्र 10 महिने झाले तरी विजेचा पत्ता नसल्याने त्यांनी त्याला खडसावल्यावर हे पैसे परत मिळाले.

20 फुटांच्या प्रवासासाठी किती वर्षे हवीत?

उर्मिला आजी आज चरितार्थासाठी गावात शाळेजवळ एक टपरी चालवतात. तेथेच त्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी खाद्यपदार्थ ठेवतात. हे पदार्थ तयार करण्यासाठी व टिकवण्यासाठी त्यांना विजेची नितांत गरज आहे. त्यांच्या घराभोवती घनदाट झाडी असून त्या घरी एकटय़ाच रहातात. घरात वीज नसल्याने त्यांना आता उतारवयात घरात रहाण्याची भीती वाटते. आपल्याला वीज जोडणीपासून का वंचित ठेवण्यात आले आहे, केवळ 20 फुटांचे अंतर पार करायला आणखी किती वर्षे लागणार याचे कोडे त्यांना अद्याप उलगडलेले नाही.

ख्यातीप्राप्त तामसतीर्थची

तामसतीर्थ हे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्द आहे. येथील तांबूस रंगाच्या समुद्रात आंघोळ केल्यास त्वचा विकार दूर होतात अशी अनेकांची श्रध्दा आहे. आचार्य अत्रे यांच्या शामची आई या चित्रपटाचे शुटींगदेखील या तामसतीर्थावर झाले होते. यात कोकणचे पिंजारी बाबा फाटक यांनी सहभाग घेतला होता.