|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » क्रिडा » दिविज शरण-सिटॅकचे आव्हान झुंजार लढतीनंतर संपुष्टात

दिविज शरण-सिटॅकचे आव्हान झुंजार लढतीनंतर संपुष्टात 

वृत्तसंस्था/ लंडन

भारताचा दिविज शरण व न्यूझीलंडचा आर्टेम सिटॅक यांची विम्बल्डन स्पर्धेतील विजयी घोडदौड अखेर उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आली. पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात आधीच्या दोन सामन्यांप्रमाणे त्यांनी झुंजार प्रदर्शन केले. पण अखेर त्यांना अमेरिकेच्या माईक ब्रायन व जॅक सॉक या अनुभवी जोडीकडून 6-7 (4-7), 6-7 (5-7), 7-6 (7-3), 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. सुमारे सव्वातीन तास रंगलेल्या या झुंजीत दिविज-सिटॅक यांनी ग्रँडस्लॅम विजेत्या जोडीला खूपच संघर्ष करण्यास भाग पाडले.

आधीच्या दोन फेऱयांतही दिविज-सिटॅक यांनी पाच सेट्सच्या लढतीत विजय मिळवून आगेकूच केली होती. या सामन्यातही त्यांनी तिसरा सेट जिंकला तेव्हा ते आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवणार असेच सर्वांना वाटले होते. चौथ्या सेटमध्ये सिटॅकला पहिल्याच गेममध्ये भेदले गेले. या सामन्यातील हा पहिला ब्रेक होता. सॉकही सर्व्हिस गमविण्याच्या मार्गावर होता. पण त्याने ती राखण्यास कसेबसे यश मिळविले. मात्र शरण-सिटॅक यांनी 4-4 वर त्यांना गाठले. पाचव्या गेममध्ये सिटॅकने पाच बेकपॉईंट्स वाचवले. पण दुहेरी चूक करीत ब्रेक बहाल केला आणि पुढच्या गेममध्ये आपल्या सर्व्हिसवर अमेरिकन जोडीने सेटसह सामनाही जिंकला. सामना गमविला असला तरी या अव्वल खेळाडूंविरुद्ध केलेल्या आणि एकूण या स्पर्धेत केलेल्या कामगिरीवर दिविज शरणने समाधान व्यक्त केले.

Related posts: