|Saturday, February 16, 2019
You are here: Home » क्रिडा » भारत-इंग्लंड वनडे मालिका आजपासून

भारत-इंग्लंड वनडे मालिका आजपासून 

टेंट ब्रिजवर रंगणार पहिला सामना, कर्णधार कोहली चौथ्या क्रमांकावर खेळणार

वृत्तसंस्था/ नॉटिंगहॅम

टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेली विराटसेना आता वनडे मालिकेतही इंग्लंडवर वरचश्मा गाजविण्यास सज्ज झाली असून गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना येथे होणार आहे. पुढील वषी याच कालावधीत इंग्लंडमध्येच विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने भारतासह इंग्लंड दौऱयावर येणाऱया सर्वच संघांना तो तयारीच्या दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. गुरुवारचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. सोनी सिक्सवरून त्याचे प्रक्षेपण होईल.

टी-20 मालिका जिंकल्याने भारताचे मनोबल उंचावलेले असले तरी वनडेतील अग्रमानांकित इंग्लंडनेही द्विदेशीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 6-0 असा धुव्वा उडविलेला आहे. त्यामुळे या प्रकारात तरी त्यांचेही मनोबल उंचावलेलेच असणार आहे. अलीकडच्या कालावधीत वनडेतील एक उत्कृष्ट संघ असा लौकीक इंग्लंडने आपल्या कामगिरीने मिळविला आहे. त्यामुळे भारताला जोस बटलर, जेसन रॉय, ऍलेक्स हेल्स, जॉन बेअरस्टो, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्स यासारख्या फॉर्मात असलेल्या लाईनअपविरुद्ध गाफील राहून चालणार नाही. निर्भय आणि आक्रमक खेळाच्या बळावरच इंग्लंडने हा लौकीक प्राप्त केला असून त्यांनी 2015 मधील विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर झालेल्या 69 पैकी तब्बल 46 वनडे सामने जिंकले आहेत. द्विदेशीय मालिकेत त्यांचा शेवटचा पराभव भारताविरुद्ध जानेवारी 2017 मध्ये झाला होता. या कालावधीत त्यांना स्कॉटलंडविरुद्ध एक धक्कादायक पराभव मात्र स्वीकारावा लागला आहे.

विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून भारतीय संघव्यवस्थापनही या मालिकेत विविध कॉम्बिनेशन्स आजमावून पाहणार आहे. लोकेश राहुलचा जबरदस्त फॉर्म ही संघव्यवस्थापनासमोरील डोकेदुखी ठरली असून त्याला संधी देत त्याचा फॉर्मचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्यासाठी कर्णधार कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. राहुलने आयर्लंडविरुद्ध 70 आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये नाबाद 101 धावा फटकावल्या. गुरुवारच्या सामन्यात आघाडी फळीत बदल होण्याची शक्यता नसल्याने रोहित शर्मा-शिखर धवन नेहमीप्रमाणे येतील. राहुलही सलामीवीर असल्याने त्याला तिसऱया क्रमांकावर खेळविले जाईल. हाच क्रम ठेवला गेल्यास वनडेतील सर्वोत्तम फलंदाज मानल्या जाणाऱया कोहलीला खालच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. अनुभवी सुरेश रैना व महेंद्रसिंग धोनी आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांच्यावर मध्यफळीची जबाबदारी राहील.

गोलंदाजीत यजुवेंद्र चहलची निवड निश्चित असून फलंदाजांच्या मनांत संभ्रम निर्माण करणारा मनगटी स्पिनर कुलदीप यादवला ब्रिस्टॉलपेक्षा टेंट ब्रिजचे मैदान मोठे असल्याने अंतिम संघात स्थान दिले जाण्याची शक्मयता आहे. संघव्यवस्थापनाने जादा वेगवान गोलंदाज खेळविण्याचे ठरविल्यास सिद्धार्थ कौल किंवा शार्दुल ठाकुर यापैकी एकाला संधी मिळू शकेल. भुवनेश्वरची पाठदुखी बरी झाली असल्यास तो उमेश यादवसमवेत नवा चेंडू हाताळेल.

इंग्लंडसाठी ऑस्टेलियाविरुद्धची मालिका नवसंजीवनी देणारी ठरली असून एका सामन्यात तर त्यांनी 481 धावा फटकावण्याचा नवा विश्वविक्रमही नोंदवला आहे. आयपीएलपासून पूर्ण बहरात असलेला बटलर या मालिकेतही हा बहर कायम ठेवण्याची जास्त शक्मयता आहे. भारताच्या दोन मनगटी स्पिनर्सना समर्थपणे तोंड देणाऱया फलंदाजांपैकी तो एक आहे. जेसन रॉयसमवेत तो पॉवरप्लेचा पूर्ण उपयोग करून घेत दमदार सुरुवात करून देऊ शकतात. ज्यो रूट व कर्णधार मॉर्गन या मधल्या फळीतील फलंदाजांना कुलदीपचा राँगवन ओळखण्यात गोंधळ उडत असल्याचे दिसून आले आहे. इंग्लंडला मोठय़ा धावसंख्या बनविण्याची सवय लागली असून 69 पैकी 31 सामन्यांत त्यांनी 300 हून अधिक धावा केल्या आहेत, त्यापैकी 23 सामने त्यांनी जिंकले आहेत. याशिवाय 11 वेळा त्यांनी 350 धावांचा आणि 400 धावांचा टप्पा तीनवेळा पार केला आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना सोपा जाणार नाही.

गेल्या जूननंतर भारताने विंडीज, लंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका मायदेशात व त्यांच्या देशात मिळून एकूण 27 वनडे सामने खेळले असून त्यापैकी प्रत्येक सामन्यात एकतरी मनगटी स्पिनर सहभागी झाला आहे. कुलदीप (20 वनडेत 39 बळी) व चहल (23 वनडेत 43 बळी) यांनी आपली क्षमता पदार्पणापासून सिद्ध करून दाखविली असली तरी इंग्लंडविरुद्ध त्यांची खरी कसोटी लागणार आहे.

 

Related posts: