|Friday, March 22, 2019
You are here: Home » क्रिडा » ज्योकोव्हिक उपांत्य फेरीत, फेडररला धक्का

ज्योकोव्हिक उपांत्य फेरीत, फेडररला धक्का 

नोव्हॅकची जपानच्या निशिकोरीवर मात

वृत्तसंस्था/ लंडन

तीनवेळा विजेतेपद मिळविलेल्या सर्बियाच्या नोव्हॅक ज्योकोव्हिकने आठव्यांदा विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान संपुष्टात आणले तर दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसनने अग्रमानांकित रॉजर फेडररला पराभवाचा धक्का देत आगेकूच केली.

31 वषीय ज्योकोव्हिक एकूण 32 व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरी खेळणार असून त्याने 24 व्या मानांकित निशिकोरीचा 6-3, 3-6, 6-2, 6-2 असा पराभव केला. 2016 मध्ये त्याने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत जेतेपद मिळविल्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याला या स्पर्धेत 12 वे मानांकन देण्यात आले आहे. त्याची पुढील लढत जुआन मार्टिन डेल पोट्रो व राफेल नादाल यापैकी एकाशी होईल.

फेडररला अँडरसनचा धक्का

एका अतिशय चुरशीच्या उपांत्यपूर्व सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आठव्या मानांकित केविन अँडरसनने दोन सेट्सची पिछाडी भरून काढत आठवेळा ही स्पर्धा जिंकणाऱया अग्रमानांकित रॉजर फेडररला पराभवाचा धक्का दिला. रोमांचक ठरलेल्या या लढतीत त्याने फेडररला 2-6, 6-7 (5-7), 7-5, 6-4, 13-11 असे नमविले. या दोघांत आतापर्यंत पाचवेळा गाठली पडली असून पहिल्यांदाच ऍडरसनने त्याला हरविले आहे. 1983 मध्ये केविन क्मयुरेनने या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. त्यानंतरचा अँडरसनचा हा इथवर मजल मारणारा पहिलाच द.आफ्रिकन खेळाडू आहे. तिसऱया सेटमधील दहाव्या गेममध्ये अँडरसनने एक मॅचपॉईंट वाचविल्यानंतर सामन्यावर पकड मिळवित अखेर एक संस्मरणीय विजय साकारला.

ज्योकोव्हिकला ताकीद

12 ग्रँडस्लॅम अजिंक्मयपदे मिळविणाऱया ज्योकोव्हिकने दोनदा आचारसंहिता भंग केली आणि पंच कार्लोस रॅमोस यांच्यावर पक्षपाताचा आरोपही त्याने या सामन्यावेळी केला. दुसऱया सेटमध्ये त्याने रागाने आपली रॅकेट कोर्टवर घुसवली होती. त्यामुळे त्याला समज देण्यात आली. त्या संदर्भात बोलताना तो म्हणाला, ‘पहिली वॉर्निंग अनावश्यकच होती, असे मला वाटते. माझ्या त्या कृतीने ग्रासचे कोणतेही नुकसान झाले नव्हते. केईनेही चौथ्या सेटमध्ये अशीच कृती केली. पण त्याला ताकीद दिली गेली नाही. आपण ते पाहिले नसल्याचे त्या संदर्भात पंचांनी मला सांगितले. त्यांचा हा दुटप्पीपणा योग्य नव्हता, असे मला वाटते,’ असे तो म्हणाला. संतप्त झाला असला तरी शेवटच्या 12 पैकी 10 गेम्स त्याने जिंकले. स्लॅममध्ये शेवटच्या चारमध्ये स्थान मिळविल्यावर खूप समाधान व आनंद होतो. गेल्या दोन आठवडय़ात माझ्याकडून चांगले प्रदर्शन होत असून स्तर अधिकाधिक उंचावत चालला आहे. अगदी योग्यवेळी मी उंची गाठत आहे,’ असे तो म्हणाला. निशिकोरी व ज्योकोव्हिक यांच्यात आतापर्यंत 15 लढती झाल्या असून त्यापैकी फक्त दोनदा निशिकोरीने विजय मिळविला आहे. निशिकोरीने पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती.

Related posts: