|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेला 25 जूनपासून सुरूवात झाली असली तरी प्रत्यक्ष महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मंगळवारी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. शहरातील 33 कनिष्ठ महाविद्यालयांसाठी एकूण 12 हजार 718 अर्ज प्राप्त झाले होते. तर 12 हजार 222 विद्यार्थ्यांची निवड यादी निश्चित करण्यात आली आहे.  निवड यादीनुसार मंगळवारपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे ज्या महाविद्यालयावर आपला नंबर लागला आहे, त्या महाविद्यालयावर विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती. कला, वाणिज्य, विज्ञान विभागाचे प्रवेश सुरू आहेत. मात्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा विज्ञान व वाणिज्य शाखेकडे ओढा आहे. विनाअनुदानित तुकडीसाठी विज्ञान शाखेला 7 हजार, वाणिज्य शाखेला 5 हजार तर कला शाखेला 3 हजार इतके प्रवेश शुल्क भरून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार शहरातील संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक आहे. www.dydekop.org या संकेतस्थळावरील तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सूचना फलकावर निवड यादीनुसार सर्वसाधारण विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्या त्या शाखेच्या तक्रार निवारण केंद्रावर काही विद्यार्थ्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये विज्ञान विभागातील विद्यार्थ्यांच्या जास्त तक्रारी आहेत. अपेक्षित कॉलेज मिळालेले नाही, घरापासून लांब अंतरावर कॉलेज मिळाले, शाखा बदलून पाहिजे अशा प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. यापैकी काही तक्रारी मान्य करण्यात आल्या तर काही तक्रारी अमान्य करण्यात आल्या. तसेच काही तक्रारी प्रलंबित ठेवण्यात आल्या.निवड यादीतील विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत. 14 रोजी रिक्त जागांवर संबंधित महाविद्यालयाच्या स्तरावर ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. 16 जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी वर्ग सुरू होणार आहेत.

Related posts: