|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोयना धरणाने पन्नाशी ओलांडली

कोयना धरणाने पन्नाशी ओलांडली 

प्रतिनिधी/ नवारस्ता

गेल्या चोवीस तासांपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळू लागला असून गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे 104, महाबळेश्वर येथे 137 तर नवजा येथे 100 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाची संततधार चालू असल्याने पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातील केरा विभागातील दिवशी खुर्द गावातील शेतकऱयाच्या घरावर माडाचे झाड कोसळून 50 हजाराचे नुकसान झाले तर याच गावातील एका शेतकयाची गाभण म्हैस ओढय़ाच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली.

     दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे कोयना धरणात येणारी पाण्याची आवक प्रतिसेकंद 38 हजार 670 क्युसेक झाली असल्याने बुधवारी सकाळीच धरणाच्या पाणीसाठय़ाने पन्नाशी ओलांडली. धरणातील पाणीसाठा 51 टीएमसी इतका झाला.

            कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोयना, काफना, केरा, मोरणा आणि तारळी या नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून तालुक्यातील लहानमोठे ओढे, नद्या, नाले तसेच धबधबे आता ओसंडून वाहू लागले आहेत. 

    धरणाच्या पाणीसाठय़ात गेल्या चोवीस तासांपासून 38 हजार 670 क्युसेक पाण्याची आवक सुरु झाली असल्याने बुधवारी सकाळीच धरणाच्या पाणीसाठय़ाने पन्नाशी ओलांडली आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणातील पाणीसाठा 50.84 टीएमसी इतका झाला आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीत गेल्या आठ तासांत 4 फुटांनी वाढ झाली. 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण बुधवारी सायंकाळी 50 टक्के भरले. पाणलोट क्षेत्रातील इतर सर्वाधिक पाऊस पडणाऱया प्रतापगड, सोनाट, वळवण, बामणोली आणि काठी येथील पर्जन्यमापकवर बुधवारी मुसळधार पावसाची नोंद झाली. तालुक्यातील साखरी चिटेघर, महिंद आणि मोरणा गुरेघर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून या प्रकल्पांच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे तर तारळी आणि उत्तरमांड या प्रकल्पात ही पुरेसा पाणीसाठा झाला असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास हे प्रकल्पही लवकरच पूर्ण क्षमतेने भरतील. दरम्यान सायंकाळ नंतरही पाटण सह कोयना पाणलोट क्षेत्रात अद्याप ही पावसाचा जोर कायम होता.

   बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत कोयना 58 (1911), नवजा 56 (1717) आणि महाबळेश्वर येथे 24 (1619) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. कोयना धरणाची पाणीपातळी 2108.02 झाली आहे.

दरम्यान, पाटण तालुक्याच्या विविध भागात ही गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे. केरा विभागातील दिवशी खुर्द येथील लक्ष्मण किसन कदम यांच्या घरावर माडाचे झाड उन्मळून पडल्याने कदम यांच्या नवीन घराचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर याच गावातील एका शेतकऱयाची गाभण म्हैस धारेश्वर शिवारातील ओढय़ाच्या पुरातून वाहून गेल्याची घटना घडली. शिवाय याच गावांत दोन विद्युत खांब उन्मळून पडल्याने गावातील बहुतांशी घरांतील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

Related posts: