|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा डेअरी : आज महत्त्वाचा फैसला

गोवा डेअरी : आज महत्त्वाचा फैसला 

प्रतिनिधी/ पणजी

कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरीच्या संचालक मंडळाचे भवितव्य आज गुरुवारी ठरणार असून संचालक मंडळ ठेवायचे? की बरखास्त करुन प्रशासक नियुक्त करायचा? याबाबतचा निवाडा सहकार निबंधक संजीव गडेकर देणार आहेत. साऱया गोमंतकीय जनतेचे या निवाडय़ाकडे लक्ष लागून राहिले आहे.

गोवा डेअरीमधील भ्रष्टाचार, बेकायदेशीर नोकर भरती, आइस्क्रिम प्लांट घोटाळा, खाद्य घोटाळा या साऱया प्रकरणांमुळे संचालक मंडळ आणि व्यवस्थापकीय संचालक हे गेले काही महिने गाजत आहेत. अध्यक्ष माधव सहकारी यांनी भ्रष्टाचार प्रकरणी व्यवस्थापकीय संचालक डॉ. नवसो सावंत यांना पदावरुन हटविण्याचा आदेश जारी करताच बहुतेक सारे संचालक एकवटले आणि त्यांनी नवसो सावंत यांना पाठिंबा देऊन त्यांच्याच मदतीने माधव सहकारी यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव संमत केला.

भ्रष्टाचार, नियमबाहय़ निर्णय झाल्याचे उघड

या प्रकरणावरुन संशयाचे वातावरण निर्माण झाले. त्यातच गोवा डेअरीबाबत सरकारकडे आलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सहकार निबंधकाने चार्टर्ड अकाउंटंट वेर्णेकर यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमून गोवा डेअरीच्या कारभाराची चौकशी सुरु केली असता यात त्यांना बरेच घबाड सापडले. गोवा डेअरीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला व अनेक निर्णय नियमबाह्य झाल्याचा ठपका ठेवून या प्रकरणी त्यांनी संपूर्ण संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालकांवर बोट ठेवले आहे.

संचालक मंडळाला नोटीस

त्यानंतर निबंधकांनी संचालक मंडळ व व्यवस्थापकीय संचालकांना नोटीसा जारी करुन आपल्याला बरखास्त का केले जाऊ नये? असा सवाल केला. त्यावर उत्तर देण्यासाठी त्यांची प्रत्यक्ष सुनावणी घेतली. या सुनावणीत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

सहकार निबंधक आज या संपूर्ण प्रकरणी महत्त्वाचा निर्णय तथा निवाडा जाहीर करणार असून संचालक मंडळ राहणार की बरखास्त होऊन प्रशासक नियुक्त होणार? याबाबतचा फैसला होणार आहे. साऱया जनतेचे याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related posts: