|Sunday, August 25, 2019
You are here: Home » क्रिडा » सनसनाटी विजयासह क्रोएशिया अंतिम फेरीत!

सनसनाटी विजयासह क्रोएशिया अंतिम फेरीत! 

फिफा फुटबॉल विश्वचषक : आघाडी प्राप्त केल्यानंतरही इंग्लंडच्या पदरी निराशा

मॉस्को/ वृत्तसंस्था

जादा वेळेपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत क्रोएशियाने इंग्लंडला 2-1 अशा फरकाने सनसनाटी मात देत फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. प्रारंभी, 90 मिनिटांच्या खेळात 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेचा अवलंब झाला. त्यात क्रोएशियाने 2-1 अशी बाजी मारली. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत विश्वचषक जेतेपदासाठी आता फ्रान्स-क्रोएशियाचे संघ आमनेसामने भिडतील.

या लढतीत पाचव्या मिनिटालाच ट्रिपिएरने गोल करत इंग्लंडला खळबळजनक आघाडी मिळवून दिली होती. पण, इव्हान पेरिसिकने 68 व्या मिनिटाला क्रोएशियाला बरोबरीचा गोल करुन देत या सामन्यात रंगत आणली. त्यानंतर 30 मिनिटांच्या अवांतर खेळात 19 व्या अर्थात 109 व्या मिनिटाला मॅन्झुकिकने अप्रतिम मैदानी गोल करत क्रोएशियाला अंतिम फेरीत धडक मारुन दिली.

मॅन्झुकिकने यावेळी इंग्लिश गोलरक्षक पिकफोर्डला चकवा देत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि याच गोलमुळे क्रोएशियाचा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला. इंग्लंडचा संघ यापूर्वी 1990 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, यंदा त्यांचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला आहे.

हॅरी केनची आक्रमणे अपयशी

स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल करणाऱया इंग्लंडच्या हॅरी केनची अनेक आश्वासक आक्रमणे पहिल्या सत्रात अपयशी ठरली होती. एकदा तर केनने चक्क दोनवेळा चेंडू गोलजाळय़ात धाडण्याचा प्रयत्न केला. पण, या दोन्ही प्रयत्नात तो क्रोएशियन गोलरक्षक सुबॅसिकचा अडथळा पार करु शकला नव्हता. रेफ्रीनी नंतर ऑफसाईड जाहीर केले. पण, तरीही केनचे अपयश इंग्लंडसाठी चिंतेचे ठरले.

या पहिल्या सत्रादरम्यान क्रोएशियाला अपेक्षित सूर सापडला नाही. त्यांचे आघाडीचे स्ट्रायकर्स सातत्याने झगडत राहिले व मिडफिल्डमध्ये देखील त्यांच्या पदरी सातत्याने निराशाच आली. क्रोएशियन गोलरक्षक सुबॅसिकने मात्र हॅरी केनची काही जोरदार आक्रमणे परतावून लावत बचावाची धार कायम राखली होती. त्याचा लाभ क्रोएशियाला जादा वेळेत झाला.

या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात इंग्लिश मॅनेजर गॅरेथ साऊथगेट यांनी टय़ुनिशिया व कोलंबियाविरुद्धच्या लढतीत संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधून घेतला होता. पण, तरीही त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

दोन्ही संघ ‘सेट’ होण्यापूर्वीच ट्रिपिएरचा गोल, तरीही…

फिफा विश्वचषकातील या दुसऱया, महत्त्वाच्या उपांत्य लढतीत दोन्ही संघ मैदानात उतरल्यानंतर प्रारंभी, अद्याप उभय संघातील महत्त्वाचे खेळाडू स्थिरावले देखील नव्हते. त्याचवेळी मोड्रिककडून प्रतिस्पर्ध्याला पाडण्याची चूक झाली आणि फ्री कीकवर ट्रिपिएरने अवघ्या 5 व्या मिनिटालाच इंग्लंडला आघाडी मिळवून दिली होती. पण, नंतर क्रोएशियाने प्रथम बरोबरी साधली व नंतर विजयही खेचून आणला. 78011 प्रेक्षकांनी या लढतीला उत्स्फूर्त हजेरी लावली होती.

35 व्या सेकंदाला गोलचा तो विक्रम मात्र अबाधित

फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत सर्वात जलद गोलचा विक्रम स्वीडनच्या अर्ने निबर्गच्या खात्यावर आहे. त्याने 1938 मध्ये स्वीडनविरुद्ध अवघ्या 35 व्या सेकंदालाच गोलजाळय़ाचा अचूक वेध घेत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली होती. याशिवाय, 1958 विश्वचषकात ब्राझीलच्या व्हावाने फ्रान्सविरुद्ध उपांत्य लढतीत दुसऱया मिनिटाला तर 1930 विश्वचषकात व्हुजादिनोव्हिकने उरुग्वेविरुद्ध चौथ्या मिनिटाला गोल केले होते. त्या यादीत ट्रिपिएरचा गोल आता चौथ्या स्थानी पोहोचला आहे.

2002  सेमीफायनलची पुनरावृत्ती टळली

यापूर्वी, 2002 फिफा विश्वचषक स्पर्धेतील दोन्ही उपांत्य सामने 1-0 अशा फरकाने निकाली झाले होते. त्या स्पर्धेत ब्राझीलने तुर्कीला तर जर्मनीने सहयजमान कोरिया प्रजासत्ताकला 1-0 अशा फरकाने नमवले होते. यंदा फ्रान्सने पहिल्या उपांत्य लढतीत बेल्जियमला 1-0 असेच नमवल्याने 2002 ची पुनरावृत्ती होणार का, याची उत्सुकता होती. पण, नंतर ती क्रोएशियाने केलेल्या गोलमुळे फोल ठरली.

2006 नंतर प्रथमच फ्री कीकवर थेट गोल!

इंग्लंडचा सुपरस्टार खेळाडू डेव्हिड बेकहॅमने यापूर्वी 2006 विश्वचषकात इक्वेडोरविरुद्ध फ्री कीकवर थेट गोल नोंदवला होता. त्यानंतर या संघातर्फे प्रथमच विश्वचषकात फ्री कीकवर असा थेट गोल झाला.