|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेही सतर्क

अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेही सतर्क 

प्रतिनिधी मुंबई

अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेसोबत मध्य रेल्वेही सतर्क झाली आहे. रेल्वे मार्गावर असणाऱया धोकादायक पुलांची पाहणीला सुरुवात झाली असून मध्य रेल्वेने आपल्या हद्दीतील पादचारी आणि उड्डाण पुलासह पाईपलाइन, वीजवाहिन्यांची  तपासणी सुरू केली आहे.

अंधेरी दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवर लागलीच धोकादायक अशी बांधकामे हटविण्यास प्रारंभ केला आहे. यामध्ये घाटकोपर येथील उड्डाण पुलाचा पादचारी मार्गही बंद करण्यात आला असून गेल्याच रविवारी ब्लॉक घेऊन मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकाजवळील जुना पादचारी पूल पाडून टाकला आहे. 1989 साली बांधलेला हा पूल जीर्ण झाला होता. सांताक्रुझ-कुर्ला लिंक रोड उड्डाण पूल सुरू झाल्यानंतर हा ब्रिज निरूपयोगी ठरला होता. कल्याणच्या पत्री पुलावरूनही अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी मध्य रेल्वेने संबंधित यंत्रणांना केली आहे. कोपर स्थानकाजवळील सिवरेज पाईपलाईन बंद असल्याने ती काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सँडहर्स्ट रोड येथील भिंत बांधण्याची म्हाडाला विनंती

सँडहर्स्ट रोड स्थानकालगत म्हाडाच्या इमारतीची भिंत कोसळल्याने ती पुन्हा बांधण्याचे काम सुरू करण्याच्या सूचना म्हाडाला करण्यात आल्या आहेत. सदर इमारतीच्या पायाची माती घसरत रेल्वेच्या भिंतीवर येत असल्याने रेल्वेची भिंती कोसळली आहे. त्यामुळे म्हाडानेही भिंत बांधण्याचे मान्य केले असल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के.जैन यांनी स्पष्ट केले.

एमएसईबीच्या वीजवाहिन्या रुळांखालून

कल्याण आणि आंबिवली येथे रेल्वेच्या मार्गावरून एमएसईबीच्या वीजवाहिन्या जात असून दोन वेळा या वीजवाहिन्या ट्रकवर पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा वीजवाहिन्या ओव्हरहेड वायर्सवरून नेण्याऐवजी रूळांच्या खालून खास पाईपलाईनद्वारे न्याव्यात, अशी विनंती महाराष्ट्र राज्य वीज महामंडळाला करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.

Related posts: