|Sunday, July 21, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, निफ्टीही जोरावर

सेन्सेक्स विक्रमी पातळीवर, निफ्टीही जोरावर 

वृत्तसंस्था /मुंबई :

‘अर्निंग्ज सिझन’चा सकारात्मक प्रारंभ आणि जागतिक शेअरबाजारांकडून मिळालेले आनंददायक संकेत यांच्या जोरावर भारतातील शेअरबाजारांनी विक्रमी झेप घेतली आहे. गुंतवणूकदारांच्या उत्साहामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक गुरूवारी दिवसअखेर 282.48 अंकांच्या वाढीसह 36,548.41 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक 74.90 अंकांच्या वधारासह दिवसअखेर 11,923.20 अंकांवर बंद झाला.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांच्या दरात झालेली मोठी वाढ आणि या कंपनीच्या बाजारी भांडवलमूल्याने पुन्हा एकदा गाठलेली 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची (6 लाख 83 हजार कोटी रूपये ) पातळी हे गुरूवारच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले. 2008 मध्ये या कंपनीने असा विक्रम केलेला होता. त्याची पुनरावृत्ती गुरूवारी झाली.

गुरूवारच्या व्यवहारांमध्ये बहुतेक सर्व क्षेत्रांच्या निर्देशांकात वाढ झालेली आढळून आली. रिलायन्स पाठोपाठ एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या कंपन्यांच्या समभागांमध्ये वाढ झाली. तथापि, वेदांता व महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांच्या समभागांना पिछेहाटीचा सामना करावा लागला. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय तसेच इंडसइंड या कंपन्यांनी निफ्टी बँक निदेशांकात तब्बल 135 अंकांची भर घातल्याचे दिसून आले. लार्सन अँड टुब्रो, कोल इंडिया, अशोका बिल्डकॉन इत्यादी कंपन्यांचे समभाग चांगले वधारले.

युरोपातील शेअरबाजारही गुरूवारी चांगल्यापैकी तेजीत होते. गेले काही दिवस हे शेअरबाजार अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या झाकोळाखाली वावरत होते. तथापि, आता ते सावरल्याचे आणि सरावल्याचे दिसत आहे. स्टॉक्स 600 या निर्देशांकात 0.4 टक्के भर पडली. आशियातील शेअरबाजारांनीही तेजीतच दिवस संपविला. शांघाई काँपोझिट आणि निक्की यांच्यामध्ये अनुक्रमे 2.18 टक्के आणि 1.17 टक्क्यांची भर पडली.

तज्ञांनी मात्र भारतातील गुंतवणूकदारांना सावधतेचा इशारा दिला आहे. तेजीच्या लाटेत वाहून जाऊ नका. अभ्यासपूर्वक निर्णय घ्या असा त्यांचा सल्ला आहे. येत्या काही दिवसात नफा कमाईमुळे निर्देशांक घसरूही शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.