|Sunday, November 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आंबाडे येथून हिरण्यकेशी पात्रातून वृद्ध शेतकरी वाहून गेला

आंबाडे येथून हिरण्यकेशी पात्रातून वृद्ध शेतकरी वाहून गेला 

प्रतिनिधी /आजरा :

आंबाडे-धनगरमोळा दरम्यानच्या ओढय़ावरील पुलावरून आंबाडे येथील शेतकरी शंकर लक्ष्मण कुराडे (वय 75) हे वाहून गेले. बुधवार दि. 11 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मात्र कुराडे वाहून गेल्याचे गुरूवार दि. 12 रोजी स्पष्ट झाले असून हिरण्यकेशी नदीला आलेले प्रचंड पाणी आणि मुसळधार पावसामुळे मृतदेह शोधण्याच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान कुराडे बेपत्ता झाल्याची नोंद आजरा पोलीसात करण्यात आली आहे.

याबाबत आंबाडे येथून मिळालेली माहिती अशी, कुराडे यांचे मूळ गाव गडहिंग्लज तालुक्यातील बेळगुंदी हे आहे. ते अल्पभूधारक असल्याने त्यांना आंबाडे येथे जमीन मिळाली आहे. गेल्या 25 वर्षांपासून अधिक काळ कुराडे कुटुंबिय आंबाडे येथे वास्तव्यास आहे. बुधवारी बेळगुंदी गावची नव्या पाण्याची यात्रा असल्याने ते आंबाडे येथून बेळगुंदीला जाण्यासाठी सकाळी निघाले. मात्र रात्रीपर्यंत ते बेळगुंदी येथे पोहोचले नाहीत. यामुळे बेळगुंदी येथील त्यांच्या नातेवाईकांनी आंबाडे येथे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असता ते बुधवारी सकाळीच बेळगुंदीला जाण्यासाठी निघाले असल्याचे सांगण्यात आले.

गुरूवारी सकाळी त्यांचा शोध घेत असताना आंबाडे-धनगरमोळा दरम्यान जवळचा मार्ग असलेल्या ओढय़ाच्या पुलाजवळ पाण्याच्या प्रवाहातील झुडपात त्यांच्या डोक्यावरील पोत्याची खोळ अडकल्याचे दिसून आले. तर गावी नेण्यासाठी आणलेला फणसही त्या परीसरात आढळून आला. हिरण्यकेशी नदीचे पाणी वाढल्यानंतर नदीचा एक प्रवाह या ओढय़ातून वाहतो. गेल्या आठ दिवसांपासून या विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशीला प्रचंड पाणी आले असून नदीचा एक प्रवाह या ओढय़ातून वाहू लागला आहे. नदीवरील कोल्हापूर बंधाऱयावरून फिरून येण्याऐवजी जवळचा मार्ग असल्याने बहुतांशी ग्रामस्थ या ओढय़ाच्या पूलावरून ये-जा करतात. त्याप्रमाणेच कुराडे या पूलावरून येत होते. मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे पूल तुटून गेल्याचे लक्षात न आल्याने ते वाहून गेले असतावेत असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Related posts: