|Thursday, February 27, 2020
You are here: Home » क्रिडा » सनसनाटी विजयासह क्रोएशिया अंतिम फेरीत!

सनसनाटी विजयासह क्रोएशिया अंतिम फेरीत! 

वृत्तसंस्था /मॉस्को :

जादा वेळेपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत क्रोएशियाने इंग्लंडला 2-1 अशा फरकाने सनसनाटी मात देत फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. प्रारंभी, 90 मिनिटांच्या खेळात 1-1 अशी बरोबरी झाल्यानंतर जादा वेळेचा अवलंब झाला. त्यात क्रोएशियाने 2-1 अशी बाजी मारली. जेतेपदासाठी फ्रान्स-क्रोएशियाचे संघ आमनेसामने भिडतील तर शनिवारी इंग्लंड-बेल्जियम यांच्यात तिसऱया क्रमांकाची लढत होईल.

या लढतीत पाचव्या मिनिटालाच ट्रिपिएरने गोल करत इंग्लंडला खळबळजनक आघाडी मिळवून दिली होती. पण, इव्हान पेरिसिकने 68 व्या मिनिटाला क्रोएशियाला बरोबरीचा गोल करुन देत या सामन्यात रंगत आणली. त्यानंतर 30 मिनिटांच्या अवांतर खेळात 19 व्या अर्थात 109 व्या मिनिटाला मॅन्झुकिकने अप्रतिम मैदानी गोल करत क्रोएशियाला अंतिम फेरीत धडक मारुन दिली.

मॅन्झुकिकने यावेळी इंग्लिश गोलरक्षक पिकफोर्डला चकवा देत गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि याच गोलमुळे क्रोएशियाचा संघ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत पोहोचला. इंग्लंडचा संघ यापूर्वी 1990 मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता. पण, यंदा त्यांचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आला आहे.

हॅरी केनची आक्रमणे अपयशी

स्पर्धेत सर्वाधिक 6 गोल करणाऱया इंग्लंडच्या हॅरी केनची अनेक आश्वासक आक्रमणे पहिल्या सत्रात अपयशी ठरली होती. एकदा तर केनने चक्क दोनवेळा चेंडू गोलजाळय़ात धाडण्याचा प्रयत्न केला. पण, या दोन्ही प्रयत्नात तो क्रोएशियन गोलरक्षक सुबॅसिकचा अडथळा पार करु शकला नव्हता. रेफ्रीनी नंतर ऑफसाईड जाहीर केले. पण, तरीही केनचे अपयश इंग्लंडसाठी चिंतेचे ठरले.

या पहिल्या सत्रादरम्यान क्रोएशियाला अपेक्षित सूर सापडला नाही. त्यांचे आघाडीचे स्ट्रायकर्स सातत्याने झगडत राहिले व मिडफिल्डमध्ये देखील त्यांच्या पदरी सातत्याने निराशाच आली. क्रोएशियन गोलरक्षक सुबॅसिकने मात्र हॅरी केनची काही जोरदार आक्रमणे परतावून लावत बचावाची धार कायम राखली होती. त्याचा लाभ क्रोएशियाला जादा वेळेत झाला.

पहिल्या टप्प्यात गॅरेथ साऊथगेट यांनी टय़ुनिशिया व कोलंबियाविरुद्ध संयम व आक्रमण यांचा उत्तम मिलाफ साधून घेतला होता. पण, त्यांचे प्रयत्न संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Related posts: