|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सरणावरच मुडदा जागा झाला तेव्हा…

सरणावरच मुडदा जागा झाला तेव्हा… 

कर्नाटकातील तरुणाला सोलापुरातील डॉक्टरांनी मृत केले होते घोषित

विशेष प्रतिनिधी/ सोलापूर

नातेवाईक, भावकी अन ग्रामस्थ मोठया संख्येने जमलेले…अंत्यविधीची तयार करण्यात आलेली होती…कुटुंबातील सदस्यांचा हमसून-दूमसून रडणं सुरु होतं….ऍम्ब्युलन्स ज्या रस्त्याने येणार होती त्या रस्त्याकडे सर्वांचे डोळे लागलेले…पुढच्या काही क्षणात माणसांच्या घोळकयाजवळ ऍम्ब्युलन्सची कचकन ब्रेकस्र दाबली जातात…परिवारातील सदस्य तसेच नातेवाईक यांचे रडणे ओरडण्याचा अन किंचळण्याचा गलका होता…ऍम्ब्युलन्सजवळची गर्दी थोडी बाजूला हटते…काहीजण पुढे सरसावतात…ऍम्ब्युलन्समधून मृतदेह बाहेर काढलं जातो…मयताला शेवटची अंघोळ घालण्यात आली….तिरडीवर ठेवून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला… सरणावर मृतदेह ठेवण्यात आला… पुढच्या काही क्षणात भडाग्नी दिला जाणार एवढयात चक्क मुडदा जीवंत झाला….रचलेल्या सरणावर उठून बसला… काहीजण घाबरून पळतात… कुटूंबातील सदस्यांना आपला माणूस जीवंत झाल्याचा साक्षात्कार होतो….दूःखद अश्रुची जागा आनंदअश्रू घेतात… सगळचं चित्र पालटतं….

वाचकहो, एखादया चित्रपटात दाखवतात असा प्रसंग कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिह्यातील गाणगापूर स्टेशन गावात घडला. ज्या प्रसंगानं हसावं की रडावं असं झालं. या गावातील ईश्वर पावडे हाच तो मयत झालेला पुन्हा जिवंत झाला. जणूकाही त्याला पुनर्जन्म मिळाला. यमाच्या तावडीतून तो सुटला.

त्याचे असे झाले की, गाणगापूर जि. कलबुर्गी इथल्या ईश्वर पावडे याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोलापूरातील डॉक्टरांनी सकाळी ईश्वरला मृत घोषित केले. त्यानंतर ईश्वरला ऍम्ब्युलन्समधून अंत्यसंस्कारासाठी त्याच्या नातेवाईकाने गावी नेले. अंतिम विधी करत असताना मयताच्या छातीला काही तरी लावत असतांना श्वास सुरू असल्याचे लक्षात आले. पुढच्या काही क्षणात कोमातून बाहेर आलेला ईश्वर चक्क सरणावर उठून बसला. मुडदा जिवंत झाल्याचे दिसताच अंत्यसंस्कारासाठी तेथे जमलेल्या काहीने तेथून धूम ठोकली, काहीजण भेदरलेल्या अवस्थेत तेथेच थांबून राहिले. काहींचा बराचवेळ श्वास रोखला गेला. तथापि अंत्यसंस्कारासाठी पुढे सरसावलेले जे काहीजण धाडसी होते. त्यांनी ईश्वर याच्या छातीवर हलकासा दाब दिला. तसा ईश्वर कोमातून चांगलाच बाहेर आला. त्याच्या डोळ्यासह शरीराच्या काही अवयवांची हालचाल सुरु झाली.

या दरम्यान मेलेला ईश्वर जिवंत झाला. हे सर्वांच्या लक्षात आले. ईश्वर आपल्यातून कायमचा गेला. या विरहाने धायमोकलून रडणारे शांत झाले. त्याच्या परिवारातील सदस्यांच्या डोळ्यातील दुःखाश्रुंची जागा आनंदाश्रुंनी घेतली. ईश्वर पावडे याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा विषय बाजूला सोडून त्याला येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मुडदा जिवंत झाल्याची वार्ता गाणगापूर स्टेशन या गावच्या पंचक्रोशीत पसरली तसे शेकडो लोक ईश्वर पावडेच्या घराकडे आणि त्याला पाहण्यासाठी सरकारी दवाखान्यात येत आहेत. ईश्वरला पाहण्यासाठी दवाखान्यात रिघ लागल्याचे सांगण्यात आले.

सोलापुरातील ते डॉक्टर कोण?

ईश्वर जिवंत असताना त्याला मृत कोणी घोषीत केले. ईश्वर सोलापुरातील कोणत्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल होता. त्याच्यावर कोणत्या डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. या संदर्भातील माहिती शुक्रवारी दिवसभर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र माहिती हाती लागली नाही.

डॉक्टरांवर कारवाईची मागणी

ईश्वर हा कोमात गेला असताना, त्याला मृत घोषीत करण्यात आले. याबद्दल ईश्वरच्या घरातील सदस्यांसह नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला. यासर्व प्रकरणात जो त्रास झाला. त्याबद्दल सोलापुरातील त्या डॉक्टरांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.