|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » धरण परिसरासह जिल्हय़ात संततधार

धरण परिसरासह जिल्हय़ात संततधार 

प्रतिनिधी/ सांगली

धरणपट्टय़ात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणातील पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ होत आहे. चांदोली धरणात आज रोजी 76 टक्के तर कोयना धरणात 55 टक्के पाणीसाठा झाला आहे. पावसाची अशीच संततधार सुरू राहिल्यास येत्या काही दिवसातच चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तविला आहे. शिवाय जिल्हय़ातही गेल्या दोन दिवसापासुन पावसाची संततधार सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नदीपात्राची पाणीपातळी झपाटय़ाने वाढत आहे.

  जिल्हय़ात पावसाने लांबपल्ल्याची विश्रांती घेतली असली तरी, प्रारंभीपासूनच धरण परिसरात पावसाचाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत आहे. 105 टीएमसी पाणीसाठय़ाची क्षमता असलेल्या कोयना धरणात 57.93 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर 34 टीएमसी पाणीसाठय़ाची क्षमता असलेल्या चांदोली धरणात 25.36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कन्हेर आणि धोम धरणातही 50 टक्के पाणीसाठा झाला आहे. कण्हेर धरणात 4.68 टीएमसी तर धोम धरणात 5.54 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

 जिल्हय़ाच्या ग्रामीण भागातही पावसाची संततधार सुरू आहे.  आज सकाळी आठ वाजेपर्यत वाळवा 22 मि.मि., पलूस 10 मि.मि., तासगाव 11 मि.मि., सांगली 13 मि.मि., शिराळा 45 मि.मि., मिरज 12 मि.मि., विटा 24 मि.मि., आटपाडी 2 मि.मि., कवठेमहांकाळ 7 मि.मि., जत 8 मि.मि. आणि कडेगाव तालुक्यात 16 मि.मि., पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाने लांबपल्ल्याची गैरहजेरी लावल्याने खरिपाची पेरणी झालेली पिके धोक्यात आली होती. शिवाय खरीपाचा पेराही थांबला होता. पण, गेली दोन दिवस पावसाच्या तास ते अर्ध्यातासाच्या अंताराने  सरी कोसळत असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय खोळंबलेला खरिपाच्या पेरणीसही सुरूवात झाली आहे. 

 दरम्यान, धरण परिसरासह जिल्हय़ात पावसाची संततधार सुरू असल्याने जिल्हय़ाला वरदान ठरणाऱया वारणा आणि कृष्णेच्या नदीपात्राच्या पाण्यातही झपाटय़ाने वाढ होत आहे. वारणा नदी तर काही भागात दुथडी भरून वाहत आहे.