|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मूर्तिकलेतील ‘गुरु’ ची आगळी संघर्षगाथा

मूर्तिकलेतील ‘गुरु’ ची आगळी संघर्षगाथा 

सुशांत कुरंगी / बेळगाव

प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्याने शिक्षण पूर्ण केले… वयाच्या 10 व्या वर्षापासून त्याचे कोवळे हात मूर्ती घडविण्याच्या कामात मदत करू लागले. आपल्या परिश्रमाच्या जोरावर त्याने जीवनाची वेगळी वाट चोखाळली. जीवनात नवे शिकण्याची उमेद घेऊन सदैव पुढे चालत राहणारा ‘गुरु’ आता मूर्तिकलेतील महागुरुंच्या शाळेमधला मुख्य कारागीर बनला आहे. संघर्षातून यशोगाथा लिहिणाऱया ‘गुरु’ची ही कहाणी आम्हा साऱयांना नवे धडे देणारी आहे.

गुरु सिद्दण्णावर हा दिसायला सामान्य असला आणि मातीत काम करत असला तरी त्याचे काम मात्र असामान्य असेच आहे. त्याने मूर्तिकलेत तर आपला वेगळा ठसा उमटविलाच. त्याचबरोबर आपल्या चित्रांच्या माध्यमातून मृत गोष्टींनाही बोलके केले. यामुळे मूर्ती बनविणारा गुरु हा कला शाखेतील उच्चशिक्षित असून त्याने आजवर आपल्या कलागुणांनी सर्वांनाच थक्क केले आहे.

माणसातील कलेचा उगम हा त्यांच्यावर ओढवलेल्या परिस्थितीतून होतो, असे अनेकवेळा म्हटले जाते. असेच काहीसे गुरुच्या बाबतीत झाले. गुरुच्या वडिलांचे त्याच्या लहानपणीच निधन झाल्याने आईला हातभार लागावा यासाठी गुरु आपल्याच संतिबस्तवाड येथील मूर्तीशाळेत कामाला जात असे. मिळालेल्या पैशातून त्याचे शिक्षण सुरू असे. ही कौटुंबिक परिस्थिती त्याच्या कलेला दिशा देणारी ठरली.

बेळगावचे दिवंगत प्रसिद्ध मूर्तिकार जे. जे. पाटील यांनी त्याचे हे गुण हेरून त्याला आपल्याकडे ठेवून शिक्षण दिले. त्याने बेनन स्मिथ कॉलेजमधून बॅचलर ऑफ फाईन ऑर्ट्स पदविका पूर्ण केली तर मास्टर ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी गदग येथून पूर्ण केली. त्याला गदग विद्यापीठाचे सुवर्णपदकही मिळाले आहे. त्याने मूर्तिकलेबरोबरच चित्रकलेतही आपले कौशल्य या काळात दाखवून दिले आहे.

अनेक कलांमध्ये पारंगत

गणेशमूर्ती घडविताना हे हात हळूहळू इतरही कलांमध्ये पारंगत झाले. त्यामुळे आज तो मेटल, फायबर, सिमेंट, प्लास्टर ऑफ पॅरिस, मातीकाम व चित्रकला अशा सर्व कलांमध्ये पारंगत आहे. आपल्या कल्पकतेने तो नव्या गणेशमूर्तींना आकार देत असतो. त्यामुळे त्याला काम करणे सोपे जाते.

अन् त्याने संधीचे केले सोने…

दरवषी देशपातळीवर कला क्षेत्रात युवा महोत्सव होत असतो. यावषी तो हरियाणा येथील रोहतक येथे झाला. यामध्ये गुरुला कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने केले. स्पर्धेच्या ठिकाणी विषय दिला जातो, 5 तासात त्या विषयावर मातीतून मूर्ती घडवायची असते. त्यावेळी डिजिटल इंडिया हा विषय देण्यात आला होता. गुरुने कामगाराच्या डोक्मयावर मेक ईन इंडियाचा सिंह काढून याच्या दोन्ही बाजू आयोजकांना दाखवून दिल्या. त्यामुळे गुरुला 50 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

स्वत:चा वर्कशॉप सुरू करायचा आहे !

सध्या गुरु हा गणपतीच्या डिझाईन देत असतो. त्यानुसार गणेशमूर्ती आकार घेत असते. त्याला आपल्या या कलेच्या माध्यमातून व पाटील कुटुंबीयांच्या सहकार्याने स्वत:चा वर्कशॉप सुरू करायचा आहे. त्यामध्ये तो मूर्तिकलेबरोबरच इतरही कला जोपासणार आहे. त्याच्या चित्रांची प्रदर्शने त्याला महत्त्वांच्या शहरांमध्ये भरवायची आहेत.

अल्पावधीतच कला आत्मसात-

विक्रम पाटील (जे. जे. पाटील यांचे पुत्र)

गुरु मागील 10 वर्षांपासून आमच्या येथे काम करत शिकत आहे. तो मेहनती व होतकरू असल्याने अल्पावधीतच त्याने कला आत्मसात केली. कोणतेही काम करण्याची इच्छा व जिद्द असेल तर ते पूर्ण होतेच, हे गुरुने दाखवून दिले आहे.

चौकट करणे

जे. जे. पाटील यांच्याकडून शिकली कला

बेळगाव व परिसरात मूर्तिकलेमध्ये ज्यांचे मोठे नाव आहे, असे दिवंगत जे. जे. पाटील यांच्याकडे गुरु याने मूर्तिकलेचे धडे घेतले. त्यांनी स्वत:च्या मुलाप्रमाणे गुरुवर पेम केले. यामुळे आज 10 वर्षे झाली तो त्यांच्याच कार्यशाळेत काम करत आपली कला जोपासत आहे. त्यामुळे तो जे. जे. पाटील यांना आपल्या प्रगतीचे श्रेय देतो.

 

Related posts: