|Saturday, February 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी

विजयनगरजवळ दोन झाडे कोसळली : युवक जखमी 

वार्ताहर / हिंडलगा

रस्त्याकडेला असलेली दोन धोकादायक झाडे अचानक कोसळल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील विजयनगर (हिं.) जवळ घडली. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सुमारे दोन तास या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना अन्य मार्गावरून वाहतूक वळवावी लागल्याने नाहक त्रास सहन करावा लागला.

 विजयनगरनजीक साई मंदिरासमोरील बेळगाव-वेंगुर्ला मार्गाच्या बाजूला दोन  जीर्ण झाडे होती. यापूर्वीच ही दोन्ही झाडे महामार्गाच्या बाजूनेच झुकलेली होती. गेला आठवडाभर झालेल्या संततधार पावसामुळे झाडांची मुळे कमकुवत बनली होती. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक दोन्ही झाडे रस्त्यावरच कोसळली. यावेळी सुदैवानेच कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण सुळगा (हिं.) येथील सूरज अधिकारी नामक तरुण हा फांदी अंगावर कोसळल्याने जखमी झाला. तर त्याच्या दुचाकीचे (केए 22, ईओ 1027) मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. झाड कोसळत असताना पाहून दुचाकीवरून उडी मारल्यानेच त्याच्या जीवावरील संकट टळले. या घटनेमुळे दुपारी उशिरापर्यंत या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत वनखात्याचे कर्मचारी रस्त्यावरील झाड हटविण्याच्या कामात व्यग्र होते.

हिंडलगा वननाक्मयापासून बेळगावपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अनेक जुनाट झाडे आहेत. यापैकी अनेक झाडे ही केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत वनखात्याकडे व सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार करून देखील गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येते. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वनखात्याने त्वरित पाहणी करून रस्त्यावरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शुक्रवारच्या अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. पोलिसही उशिरा दाखल झाले. रहदारी सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल देसाई, राहुल उरणकर व इतर नागरिकांनी  वाहतूक इतर मार्गांवरून वळविली.

Related posts: