|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’

दापोलीत श्वेतक्रांतीची नवी ‘प्रभात’ 

माटवणमध्ये आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू

म्हशीच्या दुधाला 50 रूपयांचा आसपास दर

केंद्रामुळे दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे

राजगोपाल मयेकर /दापोली

तालुक्यात गेली अनेक वर्षे शासकीय दुध डेअरीशी संलग्न पालगडचे दुध संकलन केंद्र यशस्वीपणे सुरू असताना माटवण येथेही आता नवीन दुध संकलन केंद्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे नगर जिल्हय़ातील प्रभात डेअरीशी संलग्न असलेल्या या केंद्रात म्हशीच्या दुधाला 50 रूपयांच्या आसपास दर मिळत असल्याने तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला गती येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून भाजीपाला लागवडीसह दुग्ध व्यवसायातही वाढ झाली आहे. कृषी विद्यापीठ व पर्यटनाचे केंद्र यामुळे येथील ग्राहक संख्येत गेल्या काही वर्षात झपाटय़ाने वाढ झाली आहे. त्यामुळे भाजीला मागणी वाढली आहे, पण दुधाची तहानही भागवण्यासाठीही शेतकऱयांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र गाय, म्हशी पालनाचे नियोजन व दुध वितरण अशी तारेवरची कसरत जमत नसल्याने काही दुग्ध व्यावसायिकांनी माघार घेण्यासही सुरूवात केली आहे. त्यामुळे नियमित दुध संकलन करणाऱया पालगडच्या दुध संघाचा आदर्श म्हणूनच वाखाणण्याजोगा ठरतो. येथे गाय-म्हशींच्या दुधाला फॅटनुसार 27 रूपयांच्या आसपास दर मिळतो. एकाच ठिकाणी दुध देता येत असल्याने घरोघर दुध वितरणाची तारेवरची कसरत शेतकऱयांना टाळता येते. अनेक व्यावसायिक चांगल्या ग्राहकांना बाजारातील भावाप्रमाणे दुध वितरण करून उरलेले दुध या केंद्रात कमी दराने देतात. यामुळेच उन्हाळ्य़ातही येथील केंद्रावर साडेचारशे लिटर दुध संकलित होत होते. पावसाळ्य़ातील हिरव्या चाऱयाच्या उपलब्धतेनंतर दुधाचे प्रमाण वाढत असल्याने सध्या येथे 700 लिटर दुध संकलित होत आहे. सातत्यपूर्ण कामाच्या बळावर मंगेश गोंधळेकर यांच्या निरीक्षणाखाली हे केंद्र अनेक वर्षे यशस्वीपणे सुरू आहे.

याच चळवळीला आता माटवणच्या दीपक मर्चंडे व भाऊ महाडिक यांच्या प्रयत्नामुळे वेगाने चालना मिळण्याची शक्यता आहे. या उभयतांनी माटवण येथे श्रीरामपूरच्या (जि. नगर) प्रसिद्ध प्रभात डेअरीशी संलग्न दुध संकलन केंद्र सुरू केले आहे. दोन गायींपासून दुग्ध व्यवसाय सुरू करून कोटय़वधींची उलाढाल करणारी प्रभात डेअरी उभारणारे शेतकरी किशोर निर्मळ यांची यशोगाथा कृषी क्षेत्रात गेली अनेक वर्षे वाखाणली जाते. दुग्ध व्यावसायिक शेतकऱयांचा विचार करून सुरू केलेल्या या डेअरीचे दुध संकलन केंद्र खोपी (ता. खेड) येथे काही महिन्यांपासून सुरू आहे. तेथे सध्या 5 हजार लिटरचा चिलिंग प्लांट प्रभात डेअरीच्यावतीने उभारण्यात आला आहे. येथील संतोष शिर्के यांच्या संपर्कातूनच माटवणच्या मर्चंडे व महग्नाडिक यांनीही यामध्ये उडी घेण्याचे ठरवले. गेल्या महिन्यात प्रभातने दुध मोजमाप व निरीक्षणाची अत्याधुनिक सामग्री माटवण दुध केंद्रासाठी पुरवली. त्यानंतर निर्मळ यांच्या उपस्थितीत पहिल्या दिवशी 50 लिटर दुध संकलनापासून या केंद्राचे उद्घाटनही झाले. शेतकऱयांना येथे दुध संकलन कार्ड दिले जाते. हे कार्ड एटीएमप्रमाणे स्वाईप केल्यानंतर शेतकऱयांच्या दुधाचा सर्व तपशील संगणकावर दिसतो. शेतकऱयाच्या बँक खात्यावर दर 10 दिवसांनी पैसे जमा होतात. तोपर्यंत दुध जमा केल्यानंतर त्यांच्या दुधाच्या प्रतीनुसार किती दर मिळाला, दुधाची एकूण किती किंमत झाली, याची माहिती एसएमएसद्वारे शेतकऱयांना दरदिवशी कळवली जाते. सध्या येथे सकाळ-संध्याकाळ 6 ते 8 या वेळेत दुध संकलित केले जात आहे. येथे सर्वात लक्षणीय गोष्ट ठरते, ती म्हशीच्या दुधाला मिळणारा जादा भाव. फॅटनुसार या दुधाला 50 रूपयांच्या आसपास दर मिळतो.

दापोलीवासियांचा द्राविडी प्राणायाम संपण्याची चिन्हे

दापोली तालुक्यातील अनेक व्यावसायिक म्हशीच्या दुधाला चांगला भाव मिळवण्यासाठी खेड-भरणे येथील दुध संकलन केंद्रापर्यंत जातात. त्यांचा हा द्राविडी प्राणायाम माटवणच्या दुध संकलन केंद्रामुळे संपण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या डेअरीमुळे अनेकांना दुग्ध व्यवसाय नव्याने खुणावू लागला आहे. सध्या येथे 180 लिटर दुध संकलित होत आहे. हा दुध साठा येथून खोपीला पाठवला जातो. येथे 1 हजार लिटरपर्यंत दुध संकलन झाल्यास येथे प्रभातकडून चिलिंग प्लांटचीही सोय करण्यात येणार असल्याचे केंद्राचे संचालक मनोज मर्चंडे यांनी सांगितले.

‘प्रभात’समोर आव्हान

यापूर्वी काँग्रेसचे दिवंगत नेते बाळ बेलोसे यांच्यासह अनेकांनी दापोलीत दुध संकलन केंद्र सुरू करून तालुक्यातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र पालगडची शासकीय डेअरी वगळता अन्य कोणालाही यामध्ये सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे माटवण डेअरीसमोर संकलन केंद्रांच्या अपयशाचा हा आलेख नव्याने उंचावण्याचे आव्हान आहे.