|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » किनारपट्टीवर ‘उधाणासुरा’चे तांडव!

किनारपट्टीवर ‘उधाणासुरा’चे तांडव! 

मिऱया-पंधरामाडमध्ये 70 फुट बंधारा गिळंकृत

भाटय़े बीच 5 फुटाने खचला, सुरूबनाला फटका

वॉच टॉवरलाही धोका

प्रतिनिधी /रत्नागिरी

शुक्रवारी आमवास्येपासून सुरू झालेल्या ‘हायटाईड’ने कोकण किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. रत्नागिरीतील पर्यटनक्षेत्र असलेला भाटय़े बीच सुमारे 5 फुटाने खचला आहे तर मिऱया पंधरामाड येथील धूपप्रतिबंधक बंधाऱयाचीही शनिवारी सकाळी पुन्हा वाताहात उडाली. येथील 60 ते 70 फुट लांबीचा बंधारा लांटाच्या तडाख्याने वाहून गेला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण असून प्रशासनाने खबरदारीच्या सूचना केल्या आहेत.

जोरदार पावसाने कोकण किनारपट्टीला गेल्या काही दिवसांपासून चांगलेच झोडपून काढले आहे. सोसाटय़ाच्या वाऱयामुळे घरे व इतर मालमत्तांची पडझड होण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उधाणाच्या भरतीमुळे किनारपट्टी लगतच्या मिऱया, पंधरामाड, मांडवी, भाटय़े येथील रहिवाशांच्या पोटात भीतीने गोळा उठला आहे.

पंधरामाडमध्ये सुमारे 70 फुट बंधाराच वाहून गेला

मिऱया पंधरामाड किनाऱयाला शुक्रवारी उधाणाचा तडाखा बसून धुपप्रतिबंधक बंधाऱयाला भगदाडे पडली होती. शनिवारीही उधाणाने येथील किनारपट्टीवर पुन्हा मोठे थैमान घातले. प्रचंड लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीची वाताहात उडाल्याचे चित्र आहे. येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. शनिवारी सकाळी आलेल्या प्रचंड उधाणामुळे पंधरामाड, अलावा, भाटीमिऱया भागाला मोठा तडाखा बसला.

रहिवाशांच्या डोळय़ादेखत नारळाची झाडे कोलमडली

पंधरामाड येथील आधीच ढासळलेला धूपप्रतिबंधक बंधाऱयाला प्रचंड मोठे भगदाड पडले. शनिवारी सुमारे 70 फुटापेक्षा जास्त लांबीचा बंधाराच वाहून गेला. त्यामुळे तेथील लोकवस्तीला धोका निर्माण झाला आहे. पडलेल्या प्रचंड भगदाडामुळे लगतची नारळाची झाडे ग्रामस्थांच्या डोळय़ादेखत समुद्राने गिळंकृत केली. निसर्गाच्या या रौद्ररुपामुळे झालेल्या प्रचंड नुकसानेने येथील रहिवाशांचे जगणे व चरितार्थही धशेकादायक बनला आहे.

भाटय़े बीच सुमारे 5 फुटाने खचला

समुद्राला आलेल्या उधाणाने किनारपट्टीवर दाणादाण उडवून दिली आहे. रत्नागिरी शहरानजीकचा भाटय़े बीच दरदिवशी शेकडो पर्यटकांची फुललेला असतो. शांत आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा अशी ओळख असलेल्या या बीचची समुद्राच्या उधाणाने शुक्रवारपासून वाताहात उडवून दिली आहे. येथील बीच शुक्रवारी खचण्यास सुरूवात झाली. लांटाच्या माऱयामुळे वाळूचा थर वाहून जाऊ लागला. त्यामुळे या ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. बीच खचू लागल्याने तेथील टेहळणी मनोऱयालाही धोका निर्माण झाला. सावधगिरी म्हणून भाटय़े ग्रामपंचायत स्तरावर जेसीबीच्या सहाय्याने मनोऱयाकडील खचणाऱया बाजूला वाळूचा आधार देण्यात आला होता.

उधाणाने बीच, सुरूबनही तडाख्यात

शनिवारी झालेल्या उधाणामुळे भाटय़े बीचची अवस्था अधिकच गंभीर बनली. येथील बीच सुमारे 4 ते 5 फुटांनी खचल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. उधाण आले तरे किनाऱयाला त्याचा फारसा तडाखा बसत नसे, मात्र यावेळी उधाणामध्ये सुरूबन व त्या बाजूच्या वॉच टॉवरपर्यंतचा भाग वाहून गेल्याने खचला आहे.

वॉच टॉवरला ठेवलेय दोरीने बांधून

दोन वर्षांपूर्वी येथील बीचवर पर्यटक व समुद्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वॉच टॉवर उभारण्यात आला आहे. या टॉवरलगतची वाळू लाटांनी वाहून नेली आहे. आणखी वाळू नून गेल्यास हा टॉवर वाहून जाऊ नये, यासाठी तो चक्क लगतच्या झाडांना दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमार्फत सरपंच पराग भाटकर व त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

उधाणाच्या काळात पर्यटकांना मज्जाव

भाटय़े बीचलगतच्या सुरूबनाला यापूर्वी उधाणाच्या भरतीचा कधीही तडाखा बसलेला नसल्याचे सरपंच पराग भाटकर यांनी सांगितले. यावेळी प्रथमच उधाणाच्या लाटा थेट सुरूबनात घुसल्या. त्यामुळे बीच खचलाच शिवाय लगतची सुरूची झाडेही उन्मळून पडली. सुरूबनातही मोठी भगदाडे पडून किनाऱयाची वाताहात उडाली आहे. हे उधाण अजूनही दोन ते तीन दिवस राहणार असल्याचा अंदाज रहिवासी व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रशासन स्तरावरूनही खबरदारीच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. येथील बीचवर उधाणाच्या काळात पर्यटकांनाही जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.

बुधल, वेळणेश्वरला
उधाणाच्या पाण्याचा वेढा

वार्ताहर /गुहागर

अमावस्येला समुद्राला आलेल्या उधाणाच्या पाण्याने वेळणेश्वर व बुधल येथील किनारी असलेल्या वस्त्यांना वेढा घातल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घराच्या अंगणापर्यंत आलेले हे उधाणाचे पाणी मुसळधार पाऊस पडल्यास कोणत्याही क्षणी वस्त्यांमध्ये घुसण्याची शक्यता असल्याने येथील नागरिक सतर्क झाले आहेत.

येथे समुद्रकिनारी मोठय़ा प्रमाणात असलेल्या वस्त्यांना आजपर्यंत कधीही उधाणाच्या पाण्याचा धोका पोहोचलेला नाही. मात्र यावेळी शनिवारी अमावस्येला आलेल्या उधाणाच्या पाण्याने वस्तीला वेढल्याने घबराट पसरली होती. हे पाणी घराच्या अंगणापर्यंत आल्याने ते वस्तीत घुसण्याची शक्यता होती, पण दिवसभर पाऊस नसल्याने येथील रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. येथे वस्त्यांना उधाणाच्या पाण्याचा वेढा पडला आहे, असे येथील तहसील प्रशासनाला कळताच त्यांनी तेथे आपले कर्मचारी पाठवून परिस्थितीची पाहणी करण्यास सांगितले व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. हेदवी विभागाचे सर्कल मोरे यांनी, घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. मात्र येथील वस्तीत पाणी न घुसल्याने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले.

 

 

Related posts: