|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » पालकमंत्री पालिका अधिकाऱयांवर बरसले

पालकमंत्री पालिका अधिकाऱयांवर बरसले 

अधिकाऱयांचे धाबे दणाणले : अपघातात मयत झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार : पालकमंत्र्यांचे आश्वासन

कल्याण / प्रतिनिधी

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत रस्त्यावरील खड्डय़ांमुळे पाच जणांचा अपघाती मफत्यू झाल्यानंतर शनिवारी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणमधील रस्त्यांचा पाहणी दौरा केला. यावेळी पालकमंत्री शिंदे यांनी रस्त्यांच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करत रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत, यासारखी कारणे न देता कार्यालयात बसून काम न करता रस्त्यावर उतरा, रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, अशा शब्दात अधिकाऱयांना झापले. तर शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांची चांगलीच खरडपट्टी काढली. रस्त्याच्या कामात निष्काळजीपणा करणाऱया संबंधित अधिकाऱयांवर कारवाई करा, असे आदेश दिले. तर पालकमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना शहर अभियंता प्रमोद कुलकर्णींना निलंबित करा, असे सांगितले. पुढे बोलताना मयत पाच जणांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.

कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे नियोजनहीन पद्धतीने बसवण्यात आलेल्या पेव्हरब्लॉकमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात नागरिकांसह राजकीय पक्षांनी तक्रारी-आंदोलने केली. मात्र, दुरुस्तीच्या नावाखाली या रस्त्यांना खडी मातीचा मुलामा देण्यात आल्याने रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली. खड्डय़ांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत असून अनेकांना अपंगत्व आले तर गेल्या दीड महिन्यात दुचाकीवर प्रवास करणाऱया एका चार वर्षांच्या चिमुकल्यासह पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याने हे रस्ते आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. या रस्त्यांमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागल्याने प्रसिद्धीमाध्यमातून प्रशासन आणि सत्ताधाऱयांवर एकच टीकेची झोड उठवण्यात आली. त्यानंतर पालिका आयुक्तांनी तत्काळ खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत आणण्याचे आदेश संबधित विभागला दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी पालिका आयुक्त गोविंद बोडके, शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते. रस्त्याची दुर्दशा पाहून पालकमंत्र्यांनी पालिकेच्या अधिकाऱयांची चांगलीच खरडपट्टी काढली. रस्ते कोणाच्या ताब्यात आहेत यासारखी कारणे न देता कार्यालयात बसून काम न करता रस्त्यावर उतरा आणि रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा, असे आदेश शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले.

दरम्यान, नेहमीप्रमाणे कर्तव्य दक्षतेचा आव आणत शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी सर्व अधिकारी खड्डे बुजविण्याचे काम करत असल्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या शिंदे यांनी जे अधिकारी आणि ठेकेदार कामात निष्काळजीपणा करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करा करून जबाबदार अधिकाऱयांना निलंबित करा, असे आदेश त्यांनी आयुक्तांना दिले. त्यामुळे अधिकारी वर्गाचे धाबे दणाणले आहेत.