|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडची मालिकेत बरोबरी

इंग्लंडची मालिकेत बरोबरी 

दुसऱया वनडेत भारतावर 86 धावांनी विजय

वृत्तसंस्था / लंडन

सामनावीर ज्यो रूटचे नाबाद शतक, कर्णधार इयॉन मॉर्गन व डेव्हिड विली यांची अर्धशतके आणि लियाम प्लंकेटचा भेदक मारा यांच्या बळावर इंग्लंडने दुसऱया वनडे सामन्यात भारतावर 86 धावांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सामना लीड्सवर मंगळवारी 17 रोजी होणार आहे.

प्रथम फलंदाजी निवडल्यावर रूट (116 चेंडूत नाबाद 113), कर्णधार मॉर्गन (51 चेंडूत 53), अष्टपैलू विली (31 चेंडूत 50) यांच्या दमदार खेळीमुळे इंग्लंडने 50 षटकांत 7 बाद 322 धावा जमविल्या. त्यानंतर भारताचा डाव 50 षटकांत 236 धावांत गुंडाळून इंग्लंडने विजय साकार केला. भारताच्या कोहली, रैना, धवन व धोनी यांचा अपवाद वगळता इतरांना भरीव योगदान देता आले नाही. कोहली-रैना यांन चौथ्या गडय़ासाठी 80 धावांची भागीदारी केली. कोहलीने 45, रैनाने 46, धोनीने 37, धवनने 36, हार्दिकने 21 धावा जमविल्या. प्लंकेटने 46 धावांत 4 तर विली व रशिद यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले. मोईन अली व मार्क वुड यांनी एकेक बळी मिळविला.

जेसन रॉय (42 चेंडूत 40) व जॉन बेअरस्टो (31 चेंडूत 38) यांनी 62 चेंडूत इंग्लंडला 69 धावांची अर्धशतकी सलामी दिली. उमेश व सिद्धार्थ कौल यांना स्विंगसाठी थोडीफार मदत मिळाली. पण त्यांना लवकर बळी मिळविण्यात अपयश आले. इंग्लंडचे आक्रमण जोरात सुरू असल्याचे पाहून हार्दिकला पाचव्याच षटकात गोलंदाजीस आणले. पण विराटची ही चालही निरुपयोगी ठरली. हार्दिकच्या पहिल्या 2 षटकांत 21 धावा इंग्लंडने वसूल केल्या. नवव्या षटकात चहलचा व दोन षटकानंतर कुलदीपचा मारा सुरू केला. कुलदीपने 11 व्या षटकातील दुसऱयाच चेंडूवर बेअरस्टोला त्रिफळाचीत केले. 12 चेंडूनंतर कुलदीपने रॉयलाही झेलबाद केल्यानंतर त्यांची स्थिती 2 बाद 86 अशी झाली. रूट व मॉर्गन यांनी कुलदीपचा मारा व्यवस्थित खेळून काढत ही पडझड रोखली. या दोघांनी तिसऱया गडय़ासाठी 99 चेंडूत 103 धावांची भागीदारी केली.

इंग्लंडने 25 व्या षटकात 150 धावांचा टप्पा गाठला. मॉर्गनने 38 वे वनडे अर्धशतक 49 चेंडूत पूर्ण केले तर रूटने 56 चेंडूत अर्धशतक गाठले. 34 व्या षटकाअखेर इंग्लंडने 4 बाद 203 धावा जमविल्या होत्या. उमेश व हार्दिक यांनी दुहेरी धक्का देताना बटलर (4) व स्टोक्स (5) यांना बाद केले. विली मैदानात आल्यानंतर रूटसमवेत चौफेर फटकेबाजी केली आणि शेवटच्या 8 षटकांत 82 धावा फटकावत संघाला सव्वातीनशेच्या जवळपास मजल मारून दिली. रूटने 109 चेंडूत शतक पूर्ण केले तर विलीने 31 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 50 धावा तडकावल्या. त्याचे हे पहिलेच वनडे अर्धशतक आहे. डावखुरा स्पिनर कुलदीप पुन्हा एकदा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 68 धावांत 3 बळी टिपले तर उमेश यादव, यजुवेंद्र चहल, हार्दिक पंडय़ा यांनी एकेक बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 50 षटकांत 7 बाद 322 : रॉय 40 (42 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), बेअरस्टो 38 (31 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), रूट नाबाद 113 (116 चेंडूत 8 चौकार, 1 षटकार), मॉर्गन 53 (51 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मोईन अली 13 (16 चेंडूत 1 चौकार), विली 50 (31 चेंडूत 5 चौकार, 1 षटकार), कुलदीप 3-68, उमेश 1-63, हार्दिक 1-70, चहल 1-43.

भारत 50 षटकांत सर्व बाद 236 : रोहित शर्मा 15, धवन 30 चेंडूत 36, कोहले 56 चेंडूत 45, रैना, 63 चेंडूत 46, धोनी 59 चेंडूत 37, हार्दिक 22 चेंडूत 21, चहल 12 चेंडूत 12, प्लंकेट 4-46, विली 2-48, रशिद 2-40, वुड 1-31, मोईन अली 1-42.