|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन

विठ्ठलाचे आजपासून 24 तास दर्शन 

चोवीस तास दर्शन सुविधेमुळे भाविकांची व्यवस्था सुलभ

पंढरपूर/ वार्ताहर

आषाढी यात्रा सोहळा अगदी काही दिवसावर आला आहे. अशामध्येच पालख्यांचे व भाविकांचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सावळया विठुरायाचे त्यांच्या भक्तांसाठी आजपासून चोवीस तास दर्शन खुले करण्यात आल्याची माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 

चार वा-यांपैकी आषाढी यात्रेमध्ये येणा-या भाविकांची संख्यासुध्दा जास्त असते. प्रतिवर्षी आषाढी यात्रेमध्ये किमान 15 लाखांहून अधिक भाविक येत असतात. अशावेळी जास्तीत जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन मिळावे. यासाठी चोवीस तास दर्शनाची सोय करण्यात येत असते. वास्तविक शेकडो वर्षापासून आषाढ महिन्यांच्या पहिल्या दिवसापासून ते आषाढ पौर्णिमेनंतर होणाऱया प्रक्षाळ पूजेपर्यत विठ्ठलाचे चोवीस तास दर्शन करण्यात येते आणि या माध्यमातून जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी मंदिर समितीकडुन ही सेवा पुरविण्यात येत आहे.

विशेष म्हणजे विठ्ठलाचे आजपासून चोवीस तास दर्शन सुरू केल्यानंतर दैनंदिन शेजारती, दुपारती, काकडाआरती असे नित्योपचार बंद केले आहेत. त्यामुळे आजपासून फ्ढक्त सकाळची नित्यपूजा, नैवैद्य आणि रात्रींच्या वेळी लिंबु सरबताचा नैवैद्य विठुरायाला दाखविण्यात येणार आहे. या सर्व विधीसाठी साधारणपणे 24 तासांतील दीड तासांचा कालावधी जाणार आहे. उर्वरित साडे बावीस तास विठ्ठल दर्शन होणार आहे.

आषाढी वारीत येणा-या भाविकांना विनाअडथळा दर्शन होण्यासाठी मंदिर समितीकडुन 24 तास दर्शनाची सोय केली आहे. यासाठी मंदिर समितीकडुन व्हीआयपी दर्शन, ऑनलाईन दर्शन सुविधा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे रांगेत उभ्या असलेल्या भाविकाला जास्त वेळ ताटकळत न बसता विठ्ठलाचे दर्शन लवकर घेता येणार आहे. दर्शन रांगेव्यतिरिक्त कोणत्याही मार्गांने घुसखोरी करुन दर्शन घेणा-यांना यामुळे आळा बसणार आहे. दर्शंन रांगेशिवाय उघडे असणारे दरवाजे बंद करण्यात आले आहे. यामुळे दर्शंन रांगेवर येणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे.

विठ्ठलांचे चोवीस तास दर्शन सुरू झाल्यावरच खऱया अर्थाने आषाढी यात्रेची सुरूवात होते. असा पंढरपूरकरांचा आणि वारकरी सांप्रदायाची भावना आहे.   त्यानुसार आजपासूनच वारीची मोठया प्रमाणावर असणारी लगबगही सुरू झाली आहे. विठठलांचे चोवीस तास दर्शन सुरू झाल्यामुळे मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद केले आहे. त्यामुळे साहजिकच भाविकांना सहज आणि सुलभरित्या दर्शन घेता येणार आहे. वारीच्या अगोदरसुध्दा दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येत असते.