|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मतदार आमच्याच झोळीत मते टाकतील : जयंत पाटील

मतदार आमच्याच झोळीत मते टाकतील : जयंत पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

भाजपाकडे बॅगा असतील तर आमच्याकडे झोळ्या आहेत. या झोळया घेऊन आम्ही गावभर मतांचा जोगवा मागत फिरणार असून लोक आमच्याच झोळीत जास्तीत जास्त मते टाकतील असा टोला माजीमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना हाणला. दरम्यान, सांगलीत भाजपच्या आमिषांना दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते भुलले नाहीत, त्यामुळे भाजपची अवस्था कुपोषणग्रस्तांसारखी झाली आहे, अशी टीकाही त्यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मनपाक्षेत्रात चांगला पाठिंबा मिळत असल्याचे सांगत जयंतराव पाटील म्हणाले, दोन्ही काँगेसचा एकत्रीत जाहीरनामा तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांसह प्रत्येकी सहा अशी बारा जणांची समिती तयार करण्यात आली आहे. सन 2023 पर्यंत जी विकासकामे पूर्ण करता येतील अशाच कामांचा या जाहीरनाम्यामध्ये समावेश असेल. महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या बॅगा भरुन घेऊन येणार असल्याच्या वक्तव्याचा समाचार घेत जयंतराव पाटील म्हणाले, भाजपाकडे बॅगा असल्या तर आमच्याकडे झोळ्या आहेत. या झोळ्या घेऊन आम्ही गावभर मतांचा जोगवा मागत फिरु. लोक भाजपाच्या बॅगांना न भुलता आमच्याच झोळ्यामध्ये मते टाकतील असा टोलाही, त्यांनी चंद्रकांतदादा यांचे नाव घेत हाणला.

चंद्रकांतदादांनी चार वर्षे काय केले?

सांगलीची ओळख खेडेगाव असल्याची टीका करणाऱया महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी चार वर्षात काय केल असा प्रश्न उपस्थित करत जयंतराव पाटील म्हणाले, चंद्रकांतदादा गेल्या चार वर्षापासून राज्यात मंत्री आहेत. काही काळ ते सांगलीचे पालकमंत्रीही होते. या काळात त्यांनी सांगलीसाठी काय योगदान †िदले ते सांगावे. चार रस्ते करण्यापलीकडे काहीही त्यांनी केले नाही. याउलट महाआघाडी सत्तेत असताना आम्ही अनेक विकासाची कामे केली.

सांगलीत भाजपा कुपोषणग्रस्त

सांगलीही वसंतदादा पाटील यांच्या विचारांची आहे. त्यामुळे भाजपच्या छोटय़ा-मोठय़ा भेटवस्तूंना येथील लोक भुलले नाहीत. भाजपाच्या आमिषाला दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते बळी पडले नाहीत, याबाबत समाधान असल्याचे सांगत यामुळे सांगलीत भाजपाची अवस्था कुपोषणग्रस्तांसारखी झाली आहे, अशी खरमरीत टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली. ते म्हणाले, भाजपाने सर्व समाजांवर अन्याय केला आहे. अनेकांना निराश केले आहे. त्यामुळे सांगलीकर जनता आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहील असा आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे उपस्थित होते.

मी एकटाच पुरे आहे

भाजपचे आव्हान पाहता मनपा निवडणुकीसाठी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारासाठी राष्ट्रवादीकडून कोण कोण मैदानात उतरणार याबाबत विचारले असता,  त्यांच्यासाठी मी एकटाच पुरे आहे असे सांगत जयंत पाटील यांनी भाजपाला थेट आव्हानच दिले. ते म्हणाले, मनपाक्षेत्राचा विकास हाच अजेंडा आघाडीचा आहे. त्यासाठी मी व काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील सक्षम आहोत. शहराच्या विकासाची जबाबदारी आमच्यावर आहे. ती आम्ही समर्थपणे पार पाडू.

…तर निवडणूक अधिकारी अडचणीत येणार

निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी त्यांच्या अधिकारांचा वापर केला नाही. याउलट आक्षेप मान्य आहेत. पण, न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला काही आक्षेपकर्त्यांना दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱयांची ही भूमिका चुकीची असून यामुळे यापुढच्या काळात निवडणूक निर्णय अधिकारी अडचणीत येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतले हे तपासून पाहावे लागेल असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.