|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्वस्त धान्याच्या काळ्या बाजारावर शासनाचा अंकुश

स्वस्त धान्याच्या काळ्या बाजारावर शासनाचा अंकुश 

वार्ताहर/ बावधन

सर्वसामान्य गोरगरीब जनतेला अल्पदरात धान्य मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये, गरज भागावी यासाठी स्वस्तात धान्य दुकानातून वाटप केले जाते. मात्र, आता स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळत नाही. त्याचा परस्पर काळाबाजार होताना दिसत असून वारंवार याबाबत तक्रारी वाढत होत्या. याची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून धान्याचा गैरव्यवहार रोखण्यासाठी व पारदर्शक कारभार होण्यासाठी जागा पोहोच धान्य वितरण करण्याचा आदेश व कार्यवाही सुरु केली. यामुळे काही प्रमाणात स्वस्त धान्याच्या काळ्या बाजारावर अंकुश ठेवला गेला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, रॉकेल, खाद्यतेल, साखर, डाळी अशा रोजच्या जीवनातील जीवनावश्यक वस्तू जनतेला अल्पदरात दिल्या जातात. त्यामुळे मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱया कुटुंबाला हातभार लावण्याचा शासनाचा प्रयत्न असतो. गावोगावी असणाऱया स्वस्त धान्य दुकानदार यातील काही धान्य परस्पर मोठय़ा व्यक्तींना किंवा ग्राहकांना विकत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या.

शासनाचा महत्त्वपूर्ण आदेश

त्याला आळा बसवण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना आखल्या होत्या. मात्र, यावर कायमचा अंकुश बसावा यासाठी जागा पोहोच धान्य वितरण हा मार्ग असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने शासनाने हा महत्त्वपूर्ण आदेश काढला आहे. हा माल बाहेर विकला गेला तर त्याचा फटका कार्डधारकांना बसत होता. मग दुकानदार ग्राहकांना उडवाउडवीची कारणे सांगून त्यांची तात्पुरती बोळवण करीत होते. माल आला नाही, यावेळी कमी कोटा मिळाला, यावेळचा माल खराब होता, पुढच्या वेळेस तुम्हाला जास्त धान्य देतो, अशी उत्तरे देवून ग्राहकांची समजूत काढत असे.

यामुळे गोरगरीबांची उपासमार होत होती, म्हणून शासनाने वेळोवेळी प्रयत्न करुन कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी शासकीय गोदामातून असलेल्या धान्याचा कोटा दुकानदारांच्या ताब्या न देता थेट दुकानदाराच्या जागा पोहोच करण्यास सुरुवात केली आहे.