|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जावली मासिक सभेत खडाजंगी

जावली मासिक सभेत खडाजंगी 

प्रतिनिधी/ मेढा

जनतेसाठी असणाऱया शासकीय ग्रामीण रुग्णालयामध्ये मृत ज्योती पवार या  मुलीच्या शवविच्छेदनासाठी आणलेला मृतदेहाला सुमारे चार तास वाट पाहावी लागली. शवविच्छेदनासाठी आणलेल्या मृतदेहाची प्रतारणा करून आपल्या कामात हलगर्जीपणा करणाऱया मेढा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव यांना निलंबित करा, अशी आक्रमक मागणी जावली पंचायत समिती सदस्य सौरभ शिंदे यांनी केली. त्याला सभागृहाच्या नेत्या सभापती  अरूणा शिर्के, उपसभापती दत्तात्रय गावडे व अन्य सदस्यांनी दुजोरा दिला.

जावली पंचायत समितीची मासिक सभा सभापती शिर्के यांच्या अध्यक्षेतेखाली व उपसभापती दत्ता गावडे, सदस्य विजय सुतार, कांताबाई सुतार, सौरभ शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी  डॉ. संताजी पाटील यांच्यासह विविध खात्यांचे अधिकाऱयांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. 

याप्रसंगी आरोग्य विभागाचा आढावा तालुका वेद्यकीय अधिकारी  डॉ. मोहिते देत असताना ज्योती पवार प्रकरणावरून सदस्य सौरभ शिंदे सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. शिंदे पुढे म्हणाले,  दहावीत कमी मार्क मिळाले म्हणून कुडाळच्या ज्योती पवार या विद्यार्थीनीने आत्महत्या केली होती. दोन दिवसानंतर तीचा मृतदेह सापडला.

उद्धट बोलून कुटुंबीयांचा अपमान

मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढय़ाच्या ग्रामीण रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांसह मी स्वतः घेवून आलो होतो. मात्र, त्यावेळी रुग्णालयात असणारे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत यादव यांनी ही केस माझ्या अखत्यारित नसल्याने व माझ्याकडे डॉक्टर नसल्याने मी पीएम करू शकत नसल्याचे सांगून नातेवाईक व ग्रामस्थांशी सहानभुतीने बोलण्याऐवजी उद्धट बोलून अपमान केला. शिवाय सुमारे चार तास प्रेताची अवहेलना केली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱया डॉ. यादव यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.

डॉ. यादव यांचीच ती जबाबदारी होती

यापूर्वी ही अशा प्रकारच्या अनेक घटना झाल्या असून संबंधितांनी कामात व कर्तव्यात हलगर्जीपणा केला आहे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. मोहिते यांनी, आम्ही संबधित डॉक्टरांकडे पोष्ट मार्टम करण्याची परवानगी मागितली होती; पण त्यांनी दिली नाही. नियमानुसार डॉ. यादव यांचीच जबाबदारी होती. डॉ. मोहिते पुढे म्हणाले, बिभवी, सोमर्डी, सर्जापर आणि रायगाव येथील नियमित  पाणी शुध्दीकरण न करण्यात आल्याने पिण्याचे पाण्याचे दुषित नमुने आले असल्याचे सांगून हुमगाव व पिंपळी येथे पिवळे कार्ड दिले आहे.

दरम्यान, ज्योती पवार हिच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या प्रकरणावरून संभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता. मेढा-मार्ली मार्गे पाचगणी एसटी बस अरुंद रस्त्यामुळे बंद करण्यात आली असून आखेगणी गाडी केवळ गोटेघर पर्यंत सोडण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख महाडिक यांनी दिली. शिक्षण विभागातून 3 टक्के पुस्तकांचे वाटप बाकी असून इंग्रजी माध्यमातून आता मुले मराठी माध्यमाकडे येत आहेत. तसेच चाचणी परीक्षेची तयारी ही सुरू असल्याचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी सांगितले.