|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उरमोडीचे पाणी म्हसवडला सोडणार

उरमोडीचे पाणी म्हसवडला सोडणार 

प्रतिनिधी / म्हसवड

महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत असला तरी दुष्काळी माण तालुक्यात मात्र पाऊस नसल्याने विहिरी, तलाव, बंधारे कोरडे पडत आहेत. पावसाने ही ओढ दिली असताना पाण्याअभावी पेरणी केलेली पिके जळून जाता आहेत. गेल्या दिड महिन्यांपासून उरमोडीच्या पाण्याची मागणी करत असताना, पाणी सोडण्यावरून राजकारण केले जात आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या मागणीचा विचार करून उरमोडीचे पाणी म्हसवडसह परिसरातील काही गावांसाठी सोडावे, यासाठी मागणीसाठी सर्व पक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिले.

गेल्या महिन्यात म्हसवडसह परिसरातील शेतकऱयांनी रस्ता रोको आंदोलन करून म्हसवड बंदची हाक देवून उरमोडीचे अभियंता यांना पैसे भरण्याची लेखी हमी दिली होती, तरीही पाणी सोडण्यात काही मंडळींनी पाण्याचे राजकारण करून पाण्याची पळवापळवी सुरू केल्याने पाण्याअभावी पिके जळून जात आहेत. त्यामुळे म्हसवडसह परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी सिंघल यांची तातडीची भेट घेऊन उरमोडीचे पाणी माणगंगा नदीला सोडण्याची विनंती केली व त्यांना तसे निवेदनही दिले. यास जिल्हाधिकारी सिंघल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच पाणी सोडले जाईल, याची त्यांनी ग्वाही दिली आहे. मात्र, त्यासाठी लागणारे विजेचे बिल शेतकऱयांच्या वतीने भरण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी उपस्थित सर्व शेतकऱयांनी बिल भरण्याचे मान्य केले. त्यावेळी जिल्हाधिकाऱयांनी संबधित विभागाला फोन करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत नगराध्यक्ष तुषारशेठ विरकर, पंचायत समिती उपसभापती नितीन राजगे, युवराज सूर्यवंशी, भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, शहराध्यक्ष अरविंद पिसे, सुभाष विरकर, संजय जगताप, बेलभंडारा विचार मंच अध्यक्ष डॉ.प्रमोद गावडे, आप्पाशेठ पुकळे, कैलास भोरे इंजि. बाळासाहेब माने, प्रकाश डावखरे, अनिल माने, गोविंदा राजेमाने, दादासाहेब दोरगे, विलासराव माने, सुरेश पुकळे यांच्यासह शेतकरी, राष्ट्रवादी, भाजपा, रासपाचे नेते उपस्थित होते.

दरम्यान, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह सर्वच  शेतकरी  शिष्टमंडळाने  अधीक्षक अभियंता घोगरे यांची भेट घेवून पाणी तात्काळ सोडण्याबाबतची मागणी केली. यावेळी अभियंत्याकडूनही पैसै भरण्याची मागणी झाली. शेतकऱयांनी विजेच्या बिलापोटी लागणारी रक्कम भरण्याचे मान्य केल्याने पाणी येणार असल्याने तालुक्यातील शेतकऱयांना थोडा दिलासा मिळाला असून त्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले.

Related posts: