|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » सीमाभागातूनही दूध पुरवठा थांबवा

सीमाभागातूनही दूध पुरवठा थांबवा 

प्रतिनिधी/ निपाणी

गायीच्या दूध दरात घट झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे. तसेच दूध पावडर निर्यातीला परवानगी द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात दूध बंद आंदोलन सोमवारपासून हाती घेण्यात आले आहे. या आंदोलनात सीमाभागातील शेतकऱयांनीही सहभाग घेऊन सीमाभागातून महाराष्ट्रात होणारा दूधपुरवठा बंद करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र गड्डय़ाण्णावर यांनी केले.

निपाणीतील शासकीय विश्रामगृहात दूध बंद आंदोलनासंदर्भात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. गड्डय़ाण्णावर पुढे म्हणाले, दीड वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडरच्या दरात तेजी होती. तेंव्हा खासदार राजू शेट्टी यांनी दूध पावडरच्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांच्याकडे केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. सध्या देशात सुमारे 3 लाख टन तर महाराष्ट्रात 45 हजार टन दूध पावडर पडून आहे.

1978 साली देशात राष्ट्रीय दूध विकास योजनेंतर्गत डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली दुधाचा महापूर नामक योजना राबवण्यात आली. त्यावेळी देशात दुधाचे उत्पादन कमी होते. अशावेळी युरोपियन देशांनी भारताला आर्थिक मदत करण्याऐवजी दूग्धजन्य पदार्थांच्या स्वरुपात साहाय्य केले होते. त्याचप्रमाणे भारताने आता अविकसित देशांना पैशाच्या स्वरुपात सहकार्य करण्याऐवजी दूध पावडरसारख्या अतिरिक्त उत्पादन झालेल्या वस्तूंच्या स्वरुपात मदत केल्यास त्या वस्तूंचे देशांतर्गत बाजारपेठेतील भाव स्थिर होतील, असे राजू शेट्टी यांनी संसदेत सांगितले. मात्र त्याकडेही केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणूनच दुधाचे दर कोसळले आहेत. अशावेळी सरकारने अनुदान स्वरुपात दूध उत्पादक शेतकऱयांना साहाय्य करणे आवश्यक आहे.

नाईलाजास्तव आंदोलन

कर्नाटक सरकार दुधाला 5 रुपये तर गोवा व केरळ सरकार दुधाला प्रतिलिटर 8 रुपये अनुदान देते. मात्र महाराष्ट्र सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. गायीचे दूध उत्पादक हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात वाढलेल्या शेतकऱयांच्या आत्महत्यांमध्ये दूध उत्पादकांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दुधास प्रतिलिटर 5 रुपये अनुदान द्यावे यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. मात्र ही मागणी मान्य न झाल्याने नाईलाजास्तव दूध बंद आंदोलन हाती घ्यावे लागले आहे. या आंदोलनातून मुंबईसह शहरी भागात होणारा दूधपुरवठा बंद करण्यात येणार आहे.

आंदोलन मिटेपर्यंत संयम पाळा

सोमवारी पहाटे 6 पासून महाराष्ट्रात कर्नाटकातून एक थेंबही दूधपुरवठा होणार नाही. गायीचा देखभाल खर्च हा सर्वत्र सारखाच असताना दूध दरात मात्र फरक असणे दुर्दैवी आहे. त्यामुळे सीमाभागातील दूध उत्पादकांनी आंदोलन मिटेपर्यंत महाराष्ट्रात दूध पुरवठा करू नये. शिल्लक दुधाची नासाडी न करता त्याची गावातच घरगुती विक्री करावी अन्यथा शालेय विद्यार्थ्यांना दूध वाटप करावे, असे आवाहन गड्डय़ाण्णावर यांनी केले. यावेळी प्रा. एन. आय. खोत यांनी सीमाभागातील दूध संस्थांनी दूध संकलनही बंद करावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी प्रा. मधुकर पाटील, महेश कंगळे, दत्तात्रय खोत, श्रीकांत संकपाळ, चंद्रकांत चव्हाण, संदीप पवार, नितीन पाटील, राजेश नलवडे, संताजी नलवडे, सुहास पाटील, शिवानंद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.