|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भारत-अमेरिकेच्या तिन्ही दलांचा संयुक्त युद्धाभ्यास लवकरच

भारत-अमेरिकेच्या तिन्ही दलांचा संयुक्त युद्धाभ्यास लवकरच 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारत आणि अमेरिकेच्या तिन्ही संरक्षण दलांचा चालू वर्षाअखेरपर्यंत संयुक्त युद्धाभ्यास होऊ शकतो अमेरिकेसोबत अशाप्रकारचा पहिलाच संयुक्त युद्धाभ्यास होणार असून यात भूदल, वायू तसेच नौदल सामील असेल, असे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱयाने सांगितले. या अगोदर भारताने रशियासोबत ‘इंद्र 2017’ युद्धाभ्यास केला होता. यात दोन्ही देशांच्या तिन्ही संरक्षण दलांनी सहभाग घेतला होता.

सप्टेंबरमध्ये भारत आणि अमेरिकेदरम्यान होणाऱया ‘टू प्लस 2’ संवादात याबद्दल निर्णय होऊ शकतो. या संवादात भारतातर्फे विदेशमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन तर अमेरिकेच्या वतीने विदेशमंत्री माईक पॉम्पियो आणि संरक्षण सचिव जेम्स मॅटिस सहभागी होणार आहेत.

भारत दौऱयावेळी मॅटिस यांनी सीतारामन यांच्यासोबत संयुक्त युद्धाभ्यासाबद्दल चर्चा केली होती. मागील वर्षी जून महिन्यात भारत आणि अमेरिका तसेच जपानच्या नौदलाने मलाबार युद्धाभ्यास केला होता. तत्पूर्वी वॉशिंग्टनच्या लुईस-मॅककॉर्ड या तळावर आयोजित ‘सराव 2017’मध्ये भारत आणि अमेरिकेच्या सैन्याने भाग घेतला होता.

6 जुलै रोजी होणारी टू प्लस टू बैठक पॉम्पियो यांच्या उत्तर कोरिया दौऱयामुळे टाळण्यात आली. भारत आणि अमेरिकेदरम्यान होणारा हा युद्धाभ्यास शेजारी देश तसेच हिंद आणि प्रशांत महासागर क्षेत्रातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Related posts: