|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल

आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केल्यास भडका उडेल 

प्रतिनिधी/ सांगली

शेतकऱयांनी आपल्या न्याय हक्कासाठी दूध बंद आंदोलन हाती घेतले आहे. सरकारने पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास दूध उत्पादक शेतकरी भडकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

आज बाजारात पाण्याची एक लिटर बाटली 20 रूपयास आणि शेतकऱयांनी घाम गाळून उत्पादन केलेल्या दुधाला 17 रूपये दर हा दुजाभाव कशासाठी. आज एक लिटर दूध उत्पादनासाठी 30 ते 35 रूपये खर्च येत असताना राज्यकर्ते मात्र उद्योजकांना संभाळण्यात धन्यता मानत आहेत. सरकारने तीन रूपये देण्याची घोषणा केली असली तरी ती फसवी आहे. त्यामुळे अशा फसव्या घोषणेमुळे आंदोलन मागे घेणार नाही.  दुधाला प्रती लिटर पाच रूपये अनुदान शेतकऱयांच्या खात्यावर जमा होणार नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही खास. राजु शेट्टी म्हणाले.

आज रात्री 12 वाजून एक मिनिटांनी पंढरपुरात मी स्वतः विठ्ठलाला दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरूवात करणार आहे. पण, त्यापूर्वीच सरकारने कर्नाटकातील दूध मुंबईला आणण्याचा प्रयत्न केल्याने दुध उत्पादक शेतकऱयांचा उद्रेक झाल्याने काही घटना घडल्या आहेत. पण, या घटना अन्यायग्रस्त दूध उत्पादक शेतकऱयांना सोसाव्या लागणाऱया यातनापेक्षा कमी आहेत, असे सांगून खास. शेट्टी म्हणाले, आंदोलनाचा आम्हाला घटनेने अधिकार दिला आहे. त्यामुळे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाबाबत दूध उत्पादक शेतकऱयांची दिशाभूल करण्याचा उद्योग बंद करावा.

25 हजार दूध उत्पादक शेतकऱयांचा पुण्यात मोर्चा काढला. या मोर्चाची शासनाने दखल घेतली नाही. पण, फुटलेल्या टँकरचे राजकारण सरकार करीत असेल तर दूध उत्पादक शेतकऱयांतून उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत खास. शेट्टी म्हणाले, आमचा शहरवासियांना दुधापासून अलिप्त ठेवण्याचा उद्देश नाही. आम्ही तुम्हाला फुकट दूध देऊ पण, आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यत ते विकणार नाही. दूध उत्पादक शेतकऱयांनीही रस्त्यावर ही ओतू नये. दुधाची घरात मिठाई करून खावी किंवा वाटावी. पंढरपुरातील वारकऱयांना वाटावे, शेजापाऱयांना वाटावे असे आवाहनही केले.

 

 

Related posts: