|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भाजपमधील घालमेल

भाजपमधील घालमेल 

भाजपमधील असंतोष लवकरच बाहेर यायला सुरुवात हाईल. मोदी-शहा जोडगोळी तोडून पंतप्रधानाना कमजोर करण्याचा हा बेत कितपत यशस्वी होईल ते आत्ताच सांगता येत नाही. पण भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. पक्षात बदल घडावा म्हणून भलेभले नेते पाण्यात देव सोडून बसले आहेत हे मात्र खरे.   

 

येत्या आठवडय़ात सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या अधिवेशनात अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावर विरोधकांच्या तोंडाला पाने पुसली ते विरोधी पक्ष विसरलेले नाहीत. मोदी सरकारने अशा प्रस्तावाला सामोरे जाण्याचे एक प्रकारे नाकारून फक्त विरोधी पक्षांचाच नव्हे तर साक्षात संसदेचा अपमान केलेला आहे असाच त्यांच्या विरोधकांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हे ब्रह्मास्त्र परत वापरण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडूंच्या तेलगु देशम पक्षाने केलेला आहे. मोदी सरकार विरोधात वातावरण तापवण्यासाठी विरोधी पक्ष अगोदरच आसुसलेले आहेत. अविश्वास प्रस्ताव ही त्यांच्याकरता पर्वणीच म्हणायची. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुका या वर्षाअखेर होणार आहेत. सत्ताधारी भाजप विरोधात वातावरण निर्माण करायला काँग्रेसकरता ही नामी संधी आहे. या तिन्ही राज्यात भाजप विरोधात वातावरण निर्माण होत आहे हे राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील विविध पोटनिवडणुकातून दिसून आले आहे. गेल्या आठवडय़ात पंतप्रधानांनी राजस्थानमधील प्रचाराचा नारळ फोडला असला तरी तेथील वास्तविक परिस्थिती फारशी बदलेल असे चित्र सध्यातरी दिसत नाही. उत्तर प्रदेशातील प्रचाराचा शुभारंभ देखील पंतप्रधानांनी केला असला तरी त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे बळ वाढताना दिसत नाही. योगी आदित्यनाथ यांच्या कारभाराचे भाजपला एकीकडे चटके बसत असताना दुसरीकडे अखिलेश यादव यांनी मायावतींशी सुरू केलेले राजकीय मेतकूट सत्ताधारी पक्षास जेरीस आणत आहे. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशी जुळवून घेतल्याचे नाटक अमित शहांनी केले असले तरी भाजपमधील एक मोठा गट मुख्यमंत्र्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे असा आग्रह धरत आहे किंवा बदललेल्या परिस्थितीत भाजपने नितीशकुमार यांच्या नादी फारसे लागू नये असे प्रतिपादन हा गट करत आहे. लालू यादव यांना तुरुंगात डांबल्यानंतर राजदचे बळ दिवसागणिक वाढू लागल्याने भाजपाइ हैराण झालेले आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून तेजस्वी यादव यांची प्रतिमा उजळू लागल्याने बिहारमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेऊन विरोधकांना चकित करावे असा सल्ला देखील भाजपा श्रे÷ाrंना दिला जात आहे. तात्पर्य काय तर शिवसेनेच्या बंडखोर पवित्र्यामुळे भाजपला महाराष्ट्रात अडचण निर्माण झालेली असताना उत्तर प्रदेश आणि बिहार या त्यांच्या बालेकिल्ल्यात सत्ताधारी पक्षाकरता फारसे चांगले चित्र नाही.

दीडशे खासदारांचे तिकीट कापणार?

लोकसभा निवडणुकीत सरकार विरोधी भावना घालवण्यासाठी भाजपाच्या एकूण 280 खासदारांपैकी 150 जणांचे तिकीट कापण्याचा विचार मोदी आणि शहा करत आहेत अशा बातम्या आल्याने पक्षातील अस्वस्थता वाढत आहे. ‘खासदार म्हणजे मुकी-बिचारी कोणी हाका, त्यांची तिकीटे कापून मोदी-शहांना काय फायदा होणार? सरकारविरोधी भावना जनतेत तयार झाली असेल तर खासदारांची आहुती देऊन त्यात काय फरक पडणार?’ असा खडा सवाल भाजपच्या एका नामांकित नेत्याने केला. हा नेता महत्त्वाकांक्षी असल्याने त्याला अडगळीत टाकले गेले आहे. खासदारांना अस्थिर करण्याच्या मोदी-शहांच्या या योजनेमुळे येत्या 2-3 महिन्यात भाजपमधील असंतोष बाहेर येईल अशी चर्चा आहे. ‘वाघ्या म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातो’ ही मोदी-शहा नीती सामान्य भाजपाइ समजू लागला आहे.

गेल्या चार वर्षापासून मंत्रीपदापासून दूर ठेवल्या गेलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या ज्ये÷ नेत्याचे नैराश्य वाढू लागले आहे. गेल्या आठवडय़ात सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे त्यांनी मोदी-शहांच्या भ्रमाचा भोपळा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मायावती, ममता बॅनर्जी आणि अण्णाद्रमुकच्या शशिकला या तीन महिला नेत्या एकत्र आल्या तर भाजपला लोकसभा निवडणुकीत आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागेल असा स्पष्ट इशारा स्वामी यांनी दिला आहे.

पंचाहत्तरी पार केलेल्या नेत्यांचे तिकीट काटण्याची मोदींची टीम देखील आगीत तेल ओतण्याचे काम करणार याविषयी पक्षवर्तुळात खात्री व्यक्त केली जाते. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार, भुवनचंद्र खंडुरी हे किमान चार वरि÷ नेते या गटात मोडतात. निवडणुकीपर्यंत लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन देखील ‘ज्ये÷’ होणार आहेत. मोदी-शहा शहाणे असतील तर ते जे÷ांना तिकीटे देतील. कारण सद्य परिस्थितीत ज्ये÷च विनासायास निवडून येऊ शकतील तर त्यांचे ‘भाडे के टट्टू’ पडतील असा जमालगोटा एका वयोवृद्ध भाजप नेत्याने    दिला. राज्यसभेचे नियुक्त सदस्य असलेले सुब्रमण्यम स्वामी देखील केव्हाच ‘ज्ये÷’ झालेले आहेत.

भाजपमधील घालमेल

मुरली मनोहर जोशी यांनी ‘पॉवर पॉलिटिक्स’ या फारशा प्रसिद्ध नसलेल्या एका नियतकालिकामध्ये ‘राजधर्म’ या विषयावर लेख लिहून भाजप आणि संघ वर्तुळात एक अनौपचारिक चर्चाच छेडली आहे. या लेखात महाभारतासारख्या महाकाव्याचा आधार घेऊन राजाने ‘राजधर्म’ कशा रीतीने पाळावा आणि आदर्श राज्य चालवावे याचे दाखले जोशीबुवांनी दिलेले आहेत. या लेखात सद्यस्थितीचा अजिबात उल्लेख नाही पण हे दाखले ज्या पद्धतीने दिलेले आहेत त्यावरून मोदी सरकारात काय बरोबर चाललेले आहे आणि काय नाही याच्यावरच ते भाष्य आहे. निदान भाजप आणि संघवर्तुळात असे मानले जात आहे. जोशींबुवांनी प्रणव मुखर्जी नंतर राष्ट्रपती बनावे अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा होती. मोदी-शहांनी रामनाथ कोविंदना राष्ट्रपती बनवले व दलित राष्ट्रपती बनवल्याचा डांगोरा पिटला. जोशी बुवांचे नागपूर बरोबर किती घनि÷ संबंध आहेत हे भाजपमधील प्रत्येकाला माहिती आहे. संघ आणि पंतप्रधान यांच्यामध्ये दूरी वाढत असल्याचा द्योतक हा लेख आहे की नाही याबाबत पुढील 2-4 महिन्यात कळून येईल. या लेखाने भाजपमधील घालमेल मात्र प्रकर्षाने पुढे आली आहे. ‘मरता क्मया नही करता’ या न्यायाने भाजपमधील असंतोष लवकरच बाहेर यायला सुरुवात हाईल. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप हरणार असे पक्षातील एक गट मानतो. तसे घडले तर अमित शहांना बदलण्याची मागणी जोर धरेल. मोदी शहा जोडगोळी मोडून पंतप्रधानाना कमजोर करण्याचा हा बेत कितपत यशस्वी होईल ते आत्ताच सांगता येत नाही. पण भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. पक्षात बदल घडावा म्हणून भलेभले नेते पाण्यात देव सोडून बसले आहेत हे मात्र खरे.

सुनील गाताडे

Related posts: