|Friday, March 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जीवनावेगळी मासोळी

जीवनावेगळी मासोळी 

गोपींच्या मनोवस्थेची एक अस्पष्टशी झलक आजही आपल्याला पंढरीनाथाला भेटायला आतूर झालेल्या वारकऱयाला पाहून, अनुभवायला मिळते. आषाढी एकादशी जशी जशी जवळ यायला लागते तसा तसा हाडाचा वारकरी मनातून अस्वस्थ व्हायला लागतो. तुकाराम महाराज ही अस्वस्थता वर्णन करतात-

संपदा सोहळा नावडे मनाला । लागला टकळा पंढरीचा।।

जावें पंढरीसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ।। तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ।। अभंगाचा भावार्थ असा-अनेक संपत्तीचा सुखसोहळा माझ्या मनाला आवडत नाही. त्या मनाला एकसारखा पंढरीचाच ध्यास लागला आहे. पंढरीला जावें, हीच आवड मनामध्ये असल्यामुळे आषाढी एकादशी कधी येईल असा ध्यास मनाने घेतला आहे. तुकाराम महाराज म्हणतात-अशाप्रकारची आर्त, उत्कट इच्छा ज्याच्या मनात आहे, त्याचीच चक्रपाणी एकसारखी वाट पाहतो. भक्ताला देवाला भेटण्याची उत्कट इच्छा आहे, तशीच देवालाही आपल्या लाडक्मया भक्ताला भेटण्याची तीव्र इच्छा आहे. देव नामदेवरायांना काय सांगतात पहा-

आषाढी कार्तिकी विसरूं नका मज। सांगतसे गुज पांडुरंग ।। पतित पावन मी तो आहे खरा।  तुमचेनि बरा दिसतसे ।।  तुम्ही जातां गावां हुरहूर माझें जीवा ।  भेटाल केधवा मजलागीं ।।  धांवोनिया देव गळां घाली मिठी। स्फुंदस्फुंदून गोष्टी बोलतसे ।।  तिन्हीं त्रिभुवनीं मज नाहीं कोणी ।  म्हणे चक्रपाणी नामयासी ।। अभंगाचा भावार्थ असा-आषाढी व कार्तिकी या वारींना माझी भेट घेण्याला तुम्ही विसरू नका-असे आपल्या मनीचे गुह्य पांडुरंग सांगत आहे. मी पतितांना पावन करणारा आहे, परंतु हे मोठेपण मला तुमच्यामुळेच प्राप्त झाले आहे. वारी संपल्यावर तुम्ही आपापल्या गावी परत जाता तेव्हा माझ्या मनाला हुरहुर लागते आणि तुम्ही पुन्हा केव्हा भेटाल या विचाराने मी तळमळत असतो. असे म्हणून देव भक्तांकडे धावत जातो आणि स्फुंदून स्फुंदून प्रेमाच्या गोष्टी करतो. तुमच्याशिवाय मला या त्रिभुवनात जिवलग कोणी नाही, असे पंढरीनाथ नामदेवरायांना म्हणतात.

देवाची अशी अवस्था असेल तर त्याला भेटण्यासाठी भक्त आतूर का असणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात-

कन्या सासुऱयासी जाये ।

मागे परतोनी पाहे ।।

तैसे झाले माझ्या जीवा ।

केव्हा भेटसी केशवा ।।

चुकलिया माये । बाळ हुरुहुरु पाहे ।। जीवनावेगळी मासोळी ।  तैसा तुका तळमळी ।।

अभंगाचा भावार्थ असा-तुकोबांच्या कालखंडात, लग्न झाल्यावर एखादी लहान मुलगी सासरी जाऊ लागली म्हणजे वरचेवर मागे फिरून माहेराकडे पहात असे. त्याप्रमाणे अहो केशवा, माझ्या जिवाची स्थिती झाली आहे. तुम्ही कधी भेट द्याल, असे झाले आहे. आई चुकली किंवा दृष्टिआड झाली, म्हणजे लहान मुलास हुरहुर लागून ते चहूंकडे दीनपणे टकमक पहात असते. तुकाराम महाराज म्हणतात- पाण्यावेगळी मासोळी जशी तडफड करते, त्याप्रमाणे मी तुमच्या भेटीकरिता तळमळ करतो आहे. कृष्ण भेटीची अशीच आर्तता गोपींच्या मनात आहे.

Ad. देवदत्त परुळेकर

Related posts: