|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कास, ठोसेघर पर्यटकांनी फुल्ल

कास, ठोसेघर पर्यटकांनी फुल्ल 

वार्ताहर/ कास

रिमझिम करणारा पाऊस, अधूनमधून होणारे सूर्यनारायणाचे दर्शन, त्यानंतर उठणारा इंद्रधनुष्याचा सप्तरंगी अविष्कार, निसर्गाचे हिरवेगार सुखद दर्शन आणि अंगावर गारवा आणणाऱया वातावरणात धबधब्याचे पाणी अंगावर घेण्यासाठी शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने ठोसेघर, कास, बामणोली परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला होता.

  ठोसेघर, कास, बामणोली परिसरातील धुक्याची शाल पांघरलेला हिरवागार निसर्ग आणि हिरव्यागार डोंगरदऱयांमधून कोसळत असलेले धबधबे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी रविवारी दिवसभरात या परिसरात पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. अबालवृध्दांसह तरुणाईला या बेधुंद करणाऱया वातावरणाची झिंग चढली होती. मुंबई, पुण्यासह सातारा जिल्हय़ातील पर्यटकांनी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावली होती.

  ठोसेघरचा धबधबा राज्यात प्रसिध्द आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले आपोआपच तिकडे वळतात. त्यामुळे आज परळीकडे जाणाऱया रस्त्यांना वाहनांची गर्दी वाढली होती. सज्जनगडाचा घाट चढून गेल्यानंतर ठोसेघरकडे जातानाही अनेक छोटेमोठे धबधबे कोसळत होते. त्याचाही आनंद घेताना पर्यटक दिसत होते. पर्यटकांच्या गर्दीमुळे या परिसरातील हॉटेल व्यवसायही चांगले बहरले होते.

 वजराई, भांबवली तसेच एकीव येथील धबधबा पाहण्यासाठी कास परिसरातही पर्यटकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे कास तलाव परिसरात असलेल्या हॉटेल व्यवसायीकांनी बरकत अनुभवली. कास तलाव फुल्ल भरुन वाहत असून धुक्याची दुलई पांघरलेल्या तलावाचे मनमोहक रुप डोळय़ात साठवत पर्यटकांची पावले तिथेच रेंगाळत होती. परिसरातील हॉटेलवर म्क्याची भाजलेली कणसे, शेंगा लज्जत अनुभवत पर्यटक निसर्गात रममाण होताना दिसत होते.

        कास, ठोसेघर परिसरात पर्यटकांची गर्दी

  वजराई धबधबा हा भारतात सर्वात उंचावरून तीन टप्यात कोसळत आहे. या धबधब्याचे दृष्य तांबी गावातूनच दिसण्यास सुरवात होते. गावात वाहन पार्क करून गावापासुन हाकेच्या अंतरावर असणारा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक धबधब्याजवळ जात होते. कास तलाव पठार परिसरातही छोटे छोटे धबधबे असल्याने पर्यटक तेथेही थांबु आनंद पावसात भिजत धबधब्यामध्ये उभे राहुन फोटोसेशन करत आनंद लुटत होते.

 

Related posts: