|Friday, May 24, 2019
You are here: Home » Top News » तुळसुंदे बंदरात बोट बुडाली

तुळसुंदे बंदरात बोट बुडाली 

दुसऱया बोटीसह 10 मच्छीमारांना वाचवण्यात आले यश

किनारपट्टीवर उधाणाची चौथ्या दिवशीही दहशत सुरूच

समुद्राच्या उधाणाने सोमवारीही घातले थैमान

मिऱया धूपप्रतिबंधक बंधाऱयाची ठिकठिकाणी वाताहात

अलावा, पंधरामाड, भाटीमिऱयावरील संकट गंभीर

हर्णै-पाजपंढरीत घरांमध्ये घुसले समुद्राचे पाणी

 

प्रतिनिधी /रत्नागिरी, राजापूर

गेल्या 4 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर सुरू असलेल्या उधाणाने या ठिकाणी राहणाऱया नागरिकांची झोप उडवून टाकली आहे. सोमवारीही किनारपट्टीवर उधाणाच्या अजस्त्र लाटांनी थैमान घातले. राजापूर तालुक्यातील तुळसुंदे बंदरात बुडालेल्या 2 बोटींपैकी एका बोटीला वाचवण्यात यश आले तर दुसरी बोट समुद्रात गायब झाल्याची घटना घडली. यातील 10 मच्छीमारांची प्रसंगावधानामुळे सुखरूप सुटका झाली आहे. याच उधाणाच्या भरतीमुळे दापोली तालुक्यातील हर्णै-पाजपंढरी गावात समुद्रकिनारी असलेल्या अनेक घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले. त्यामुळे प्रशासनाने येथील 33 कुटुंबांना तातडीने नोटीस बजावली आहे. रत्नागिरीतील मिऱयावासिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. तर काळबादेवीसह भाटय़ेतील किनाऱयाची प्रचंड धूप सुरू आहे.

..अन् बोटीत घुसले पाणी

राजापूर तालुक्यातील तुळसुंदे येथील मच्छीमार मासेमारी करण्यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान दोन बोटींमध्ये गेले होते. दोन्ही बोटींवरील हे 10 मच्छीमार एकत्रितपणे मासेमारी करत होते. यावेळी खोल समुद्रात गेल्यावर उसळत्या लाटा व पाण्याचा अंदाज न आल्याने या बोटींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे दोन्ही बोटी बुडाल्या. याचवेळी धानिवरे येथील राजन वाडेकर, विक्रांत वाडेकर व तन्मय वाडेकर हे नेहमीप्रमाणे समुद्रकिनारी गरवण्याचे काम करत असता त्यांना समोरील लाईट हाऊस किनाऱयावर आरडाओरड व गोंधळ ऐकू आला.

तत्काळ राजन वाडेकर यांनी आपल्या भावाला या बाबत फोन करून कळविले. त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱयांसह ते समुद्राच्या दिशेने गेले. यावेळी समुदात उधाणाच्या पाण्यामुळे अडचणी येत होत्या. परंतु त्याची तमा न करता हे सर्वजण समुद्रात स्वार झाले आणि त्या बोटीवरील 10 मच्छीमारांचे प्राण वाचवले. सुमारे अडीच तास चाललेल्या या मदतकार्यात एक बोट सुरक्षित करण्यात यश आले. मात्र दुसरी एक बोट समुद्रात गायब झाली. यामध्ये मच्छीमारांचे सुमारे 3 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. योग्यवेळी देवदूत आल्याने आपले प्राण वाचल्याचे त्या मच्छीमारानी सांगितले. सुदैवाने मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

गेल्या अमावास्येच्या मुहुर्तावर समुद्राला आलेले प्रचंड मोठे उधाण अजून थांबलेले नाही. या उधाणाने कोकण किनारपट्टीवर दहशत माजवली आहे. उसळणाऱया अजस्त्र लाटा केवळ किनाऱयावर थांबलेल्या नाहीत तर किनाऱयाला पोखरून थेट लगतच्या वस्तीपर्यंत घुसू लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. आजपर्यंतच्या उधाणाच्या भरतीची ही गंभीर स्थिती प्रथमच उद्भवल्याचे येथील नागरिकांतून सांगण्यात येत आहे. अशा प्रकारे उधाणाची स्थिती राहिल्यास रहिवाशांच्या वास्तव्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. रत्नागिरीनजीकच्या मिऱया किनारपट्टीला मोठा तडाखा या लाटांनी दिला आहे. येथील अलावा ते पंधरामाड किनारपट्टी रक्षणासाठी घालण्यात आलेला धूपप्रतिबंधक बंधाऱयाची वाताहात उडाली आहे. गेल्या 4 दिवसात या बंधाऱयाला भगदाड पडून तो ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अलावा, पंधरामाड, भाटीमिऱया येथील बंधाऱयाची स्थिती पाहता गंभीर चित्र उभे झाले आहे. समुद्राच्या अजस्त्र लाटा आता थेट नागरिकांच्या घरापर्यंत उसळी घेऊ लागल्या आहेत. तेथील लगतच्या बागायतींचेही नुकसान होऊ लागले आहे. भविष्यात असेच उधाण येत राहिल्यास या वस्तीलाच धोका निर्माण झाला आहे.

शहरानजीकची भाटय़े किनारपट्टीची प्रथमच प्रचंड धूप या उधाणाने केली आहे. सुमारे 4 ते 5 फुट उंच खड्डामय झालेली धूप येथील किनारपट्टीच्या संरक्षणाचे गंभीर वास्तव निर्माण केले आहे. उधाणाने किनारा संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या सुरूबनात मजल मारली आहे. त्यामुळे तेथील सुरूची झाडेही उखडून पडली आहेत. पर्यटनासाठी उभारण्यात आलेल्या सुविधा पथदीप, वॉच मनोऱयाखालची वाळूही पोखरल्याने गंभीर स्थिती निर्माण झाली असून त्यात अधिक वाढ होऊ लागली आहे. मांडवी जेटी उधाणावेळी सोमवारीही पाण्याखाली जाऊन नव्या बांधकामाला धोका निर्माण झाला आहे.

काळबादेवीत समुद्राच्या घुसखोरीमुळे गाव नष्ट होण्याची भीती

रत्नागिरी तालुक्यातील काळबादेवीचा समुद्रकिनारा वारंवार येणाऱया उधाणामुळे गिळंकृत होऊ लागला आहे. आजपर्यंत सुमारे 25 ते 40 मीटरपर्यंत येथील किनारा समुद्राने गिळंकृत केल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या उधाणाने येथील किनारा खणलाच पण त्या लगतची स्मशानभूमीही वाहून गेली. लोकांच्या पिण्याच्या पाणी विहिरींचे पाणीही मचूळ बनले आहे. येथील किनारा संरक्षणासाठी उभारलेल्या धूपप्रतिबंधक बंधाऱयाची उपाययोजनेसाठी 800 मीटरचा बंधारा उभारण्यात आला. त्यासाठी 5 कोटीचा खर्च झाला आहे. उर्वरित सुमारे 250 मीटर बंधाऱयासाठी 2 कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हा धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी प्रशासन स्तरावरून दिरंगाई होत असल्याने गावावरील धोका कायम असल्याचे येथील ग्रामस्थ राजू पारकर, महेंद्र बिर्जे यांनी सांगितले. अशीच स्थिती कायम राहिल्यास हे समुद्र गिळंकृत करण्याचे संकट उभे आहे. त्यासाठी प्रशासन स्तरावरून धूपप्रतिबंधक बंधारा उभारण्यासाठी तातडीने उपाययोजना आखण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

खेडला पावसाने झोडपले

खेडः रविवारी रात्रीपासून धुवाँधार कोसळणाऱया पावसाने सोमवारीही तालुक्याला चांगलेच झोडपले. मुसळधार पावसामुळे जगबुडी व नारिंगी नदी दुथडी भरून वहात होत्या. जगबुडी नदीने सोमवारी सकाळी 7.30 वा.च्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली होती. मात्र त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने पूरसदृश स्थिती ओसरताच व्यापाऱयांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दुपारपर्यंत पावसाची संततधार कायमच होती. मात्र सायंकाळच्या सुमारास पावसाने पुन्हा उघडीप घेतली. समाधानकारक पावसामुळे भातशेतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. वाशिष्ठीसह शिवनदीने गाठली धोक्याची पातळी

चिपळूणः येथे सातत्याने जोरदारपणे सुरू असलेल्या पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीने धोक्याची पातळी गाठली आहे. या पावसात तालुक्यातील काही ठिकाणी वृक्ष कोसळून हजारोंचे नुकसान झाले आहे. गेले काही दिवस येथे सातत्याने पाऊस सुरू असून या पावसामुळे शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱया शिवनदीबरोबरच वाशिष्ठी नदीही दुधडी भरून वहात आहे. वाशिष्ठी नदीवरील जुन्या बाजारपुलाला लागून पाणी वहात असून पुलाच्या एका बाजूला पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळ एकेरी करण्यात आली होती. तसेच भेंडीनाका व वडनाका येथील एकविरा मंदिरानजीकच्या परिसरातही पाणी घुसले होते. एकूणच दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून नगर परिषद व शासकीय यंत्रणेकडून सातत्याने याबाबतची नोंद घेतली जात होती. या पावसात कोळकेवाडी येथील बोलाडवाडीतील महादेव गोविंद काळबे यांचा गोठय़ावर वृक्ष कोसळून 5 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच रामपूर-जोधगाव येथील मनोज जाधव यांच्या घरावर वृक्ष कोसळून 2500 रूपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी येथे 73 मि. मी. पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत 2506.69 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

Related posts: