|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे

राजापूर नगराध्यक्षपदी काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे 

भाजपसह सेना उमेदवाराचा केला 1642 मतांनी पराभव

विजयामुळे काँग्रेसने नगर परिषदेवर वर्चस्व राखले कायम

संधीचे सोने करण्यात शिवसेना सपशेल अपयशी

 

प्रतिनिधी /राजापूर

राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे यांनी सेनेच्या अभय मेळेकर यांच्यासह भाजपाचे गोविंद बाकाळकर यांचा धुव्वा उडवत तब्बल 1642 मतांनी विजय मिळवला. त्यांच्या या विजयाने काँग्रेसने नगर परिषदेवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र सर्व ताकदीनिशी उतरलेल्या शिवसेनेला मिळालेल्या संधीचे सोने करण्यात सपशेल अपयश आले आहे. तर विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणाऱया भाजपाला अपेक्षित मतदान झालेच नाही. दरम्यान लोकनियुक्त नगराध्यक्षपदी मायलेकाची निवड होण्याची ही राजापूरच्या इतिहासात पहिलीच वेळ ठरली आहे.

राजापूर नगर परिषदेची नगराध्यक्षपदासाठीची पोटनिवडणूक रविवारी पार पडली. काँग्रेस आघाडी, शिवसेना व भाजपा अशी तिरंगी लढत झाल्याने ही लढत चुरशीची होईल, असे सुरूवातीच्या काळात वाटत होते. मात्र प्रत्यक्ष निवडणूक निकाल उलटाच लागला. पहिल्या व तिसऱया फेरीचा अपवाद वगळता अन्य सर्व फेऱयात जमीर खलिफे यांनी आघाडी घेत विजय संपादन केला. अंतिमतः जमीर खलिफे यांना 3150, अभय मेळेकर यांना 1508, गोविंद चव्हाण यांना 422 नोटाला 61 मते मिळाली. त्यामुळे काँग्रेस आघाडीचे जमीर खलिफे यांना 1642 मतांनी विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

सोमवारी सकाळी 10 वा. राजापूर नगर परिषदेच्या बॅ.नाथ पै कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाली. जेमतेम तासाभरातच ही मतमोजणीचे काम संपले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सेनेचे अभय मेळेकर यांनी 90 मतांची आघाडी घेत सुरूवात चांगली केली होती. मात्र दुसऱया फेरीत जमीर खलिफे यांनी 230 मतांची आघाडी घेतली. तिसऱया फेरीत मेळेकर यांना नाममात्र 43 मतांची आघाडी मिळाली असली तरी या तिसऱया फेरीअखेर खलिफे 97 मतांनी आघाडीवर होते. त्यानंतर झालेल्या चौथ्या फेरीपासून अखेरच्या म्हणजेच आठव्या फेरीअखेर जमीर खलिफे यांनाच आघाडी मिळत गेली.

शिवसेनेच्या मतांमध्ये घट

जमीर खलिफे यांना चौथ्या फेरीत 252, पाचव्या फेरीत 367, सहाव्या फेरीत 437, सातव्या फेरीत 310 तर शेवटच्या व आठव्या फेरीत 179 मताधिक्क्य मिळाले. 5141 मतदान झालेले असताना त्यातील तब्बल 3150 मते जमीर खलिफे यांना मिळाली. त्यांची मतांची टक्केवारी 61.27 एवढी राहिली. गतवेळी सेना उमेदवाराला 1931 मते मिळाली असताना यावेळी त्यांना 1508 मतांवर समाधान मानावे लागले. यावरून सेनेच्या मतांमध्ये घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या मतांमध्ये वाढ

हीच गत भाजपा उमेदवाराच्या बाबतीत झाली आहे. भाजपा उमेदवाराला गतवेळी 773 मते मिळाली होती. मात्र यावेळी पूर्ण ताकद लावून व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने पाठिंबा देऊनही त्यांना 422 मतेच मिळाली. मात्र गतवेळच्या तुलनेत यावेळी कमी मतदान झालेले असताना काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या मतांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. गतवेळी आघाडीच्या उमेदवाराला 2981 मते मिळाली होती. तर यावेळी 3150 मते मिळाली.

निवडणूक निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जवाहर चौकातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला नूतन नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी विधान परिषद सदस्या आमदार हुस्नबानू खलिफे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष जयवंत दुधवडकर, माजी पं.स.सदस्य दिवाकर मयेकर, सदानंद चव्हाण, जयप्रकाश नार्वेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आत्माराम सुतार, जि.प. सदस्या गोपाळ ऊर्फ आबा आडिवरेकर, माजी नगराध्यक्ष हनिफ काझी, इम्रान मुल्ला, माजी नगरसेवक देवदत्त वालावलकर, नाना कुवेसकर, आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

लोकनियुक्त नगराध्यक्षपद निवडणुकीत खलिफेंचा विक्रम

लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिड हजार वा त्यापेक्षा अधिक मतांनी विजय मिळविण्याचा विक्रम काँग्रेस आघाडीचे उमेदवार जमीर खलिफे यांनी केला आहे.

राजापूर नगर परिषदेच्या इतिहासात आतापर्यंत चारवेळा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी निवडणुका झाल्या. यामध्ये हुस्नबानू खलिफे यांनी एकदा विजय मिळवला होता. तर त्यानंतर आता त्यांच्या मुलाने म्हणजेच जमीर खलिफे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळवला. राजापूरच्या इतिहासात यापूर्वी पिता-पुत्र नगराध्यक्ष झाले आहेत. मात्र लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ.खलिफे व जमीर खलिफे या माता-पुत्राने अनोखा विक्रम केला आहे.

मतदारांचा विश्वास सार्थ ठरवणार

हा विजय काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अपार मेहनतीचा व आपल्यावर विश्वास टाकलेल्या शहरातील तमाम सुज्ञ मतदारांचा आहे. शहरातील मतदारांनी विकासाला प्राधान्य देताना जो विश्वास आपल्यावर दाखवला त्याला पात्र ठरताना तो निश्चितच सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया राजापूरचे नूतन नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांनी दिली. शहरातील विकासकामांना अधिक प्राधान्य देताना शहराच्या समस्या सोडवण्यासाठी आपण कटीबध्द राहू, असे त्यांनी सांगीतले.

जमीर खलिफे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतील

या निवडणुकीत बाहेरील काही व्यक्तींनी आमची अभेद्य फळी भेदण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्यांना अजिबात बधले नाहीत. येथील सुज्ञ मतदारांनी यापूर्वी आपल्यावर विश्वास दाखवला होता. आता हा विश्वास मुलगा जमीरवरही दाखवला आहे. यातून येथील जनतेने खलिफे कुटुंबियांवर सदैव प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. आता येथील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न जमीर खलिफे निश्चितच करतील व शहर विकासासाठी कटीबध्द राहतील, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसच्या विधान परिषद सदस्या हुस्नबानु खलिफे यांनी दिली.