|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ।। देवा तुझ्या नावाचं रं याडं लागलं ।।

।। देवा तुझ्या नावाचं रं याडं लागलं ।। 

किरण बोळे / फलटण

दा माझे डोळे जडो तुझे मूर्ती

रखुमाईच्या पती सोयरिया ।

गोड तुझे रुप गोड तुझे नाम

देई मज प्रेम सर्वकाळ ।।

विठो माऊलीये हाची वर देई

संचरोनी राही हृदयामाजी ।

तुका म्हणे काही न मागे आणिक

तुझे पायी सुख सर्व आहे ।।

याच भावनेने पंढरपूराकडे वाटचाल करीत चाललेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत व वारकऱयांची तन, मन व धनाने सेवा करून फलटणकरांनी तृप्त भावनेने माऊलींना भावपूर्ण निरोप दिला. सोमवारच्या बरड मुक्कामानंतर मंगळवारी हा सोहळा सोलापूर जिह्यात प्रवेश करणार आहे.

दरम्यान, पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी पालखी तळावर वीजेचा धक्का लागून दोन वारकऱयांचा मृत्यू व एक गंभीर जखमी झाल्याने या घटनेची अनेकांना हुरहुर लागून राहिली. आळंदीहून पंढरपूरकडे निघालेला माऊलींचा हा सोहळा रविवारी सायंकाळी ऐतिहासिक फलटणनगरीत विसावला. हा पालखी सोहळा शहरात दाखल झाल्यानंतर माऊलींच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. फलटण येथील एक दिवसाचा मुक्काम उरकून आणि फलटणकरांच्या स्वागताने भारावलेल्या माऊलींच्या सोहळ्याने सोमवारी सकाळी 6 च्या सुमारास वरुणराजाच्या वर्षावातच बरड मुक्कामाकडे प्रस्थान केले. तत्पुर्वी पहाट पूजेनंतर माऊलींच्या पादुकांवर अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते तुळशी पत्र वाहण्यात आले. फलटणचा मुक्काम संपवून पालखी सोहळा शहरातील ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर आला असता, निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने माऊलींची पूजा झाली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक-निंबाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. तद्नंतर हा सोहळा विडणी येथे न्याहरीकरिता थांबला. यावेळी अब्दागिरेवाडी येथे श्रीराम कारखान्याचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब शेंडे, विडणीच्या सरपंच रुपाली अभंग, पोलीसपाटील धनाजी नेरकर, डी. बी. चव्हाण, गणेश बडबडे, धीरज अभंग आदींसह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.

विडणीत न्याहरी व अल्प विश्रांती घेवून हा सोहळा दुपारच्या जेवणाकरिता पिंप्रदकडे मार्गस्थ झाला. पिंप्रद येथे सोहळ्याचे स्वागत सरपंच विजय घनवट, उपसरपंच उमेश भगत, पोलीसपाटील सुनील बोराटे यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थांनी केले. बरड येथील पालखी तळावर माऊलींचे आगमन झाल्यावर सोहळ्याचे स्वागत प्रशासक एस.आर. बाचल यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले.       दरम्यान, बरड येथील माऊलींचा मुक्काम हा सातारा जिह्यातील शेवटचा मुक्काम असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा मंगळवारी दुपारी सोलापूर जिह्यात प्रवेश करणार आहे.

।। कानडाऊ विठ्ठलू ।।

 

श्चलपणे चालणे एथिचे….

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म

भेदाभेद भ्रम । अमंगळ ।।

ज्ञानदेवांच्या काळात सुरू झालेली पांडुरंगाची वारी आजही अव्याहतपणे चालू आहे. त्याचं श्रेय प्रत्येक संतांना जाते, एखादं चांगलं काम निःस्वार्थपणे शतकानुशतके चालते म्हणजे साऱया जगाला आश्चर्य वाटावे, अशीच ही वारी आहे.

आळंदीच्या आणि देहूच्या वाडय़ातून निघालेल्या पालख्या हजारो पायांनी पंढरपूरपर्यंत जाताना वैष्णव म्हणजे नेमके काय, याची प्रचिती येते आणि मनोमन पटते.

“होय होय वारकरी । डोळा पाहे पंढरपुरी’’

त्रिगुणांचा साक्षात आकार म्हणजे, मनुष्य जन्म शिवाच्या कृपाने, देह मिळतो तर विष्णूच्या कृपेने, सृष्टी ब्रह्मदेव तर या साऱयाचे निर्माते अन् पार्वती माता चैतन्याचे हुंकार देते. म्हणून मुळातच मानव जन्म ईश्वराचा प्रसाद असे जे-जे लोक मानतात, ते सारेच या वारकऱयांच्या रूपात एकवटतात अन् चैतन्य पिठाच्या माऊलीकडे म्हणजेच पांडुरंगाकडे साऱया विश्वाच्या कल्याणाचीच प्रार्थना करतात.वारी सुरू होताना कुठल्याच सुधारणा जरी नसल्यातरी पायी चालत राहिले तर आपल्या ध्येयाप्रत सहज पोचता येते या वैदिक वचनाची जाण होते.

चराति चरतो भग ।

चालण्याचे भाग्य चालते; पण आम्ही मॉडर्न युगात आमच्या जगण्याचाच वेग इतका वाढलाय की, चालणंच विसरलोय. आमचा चालण्याचा वेग संपल्यामुळे आमच्या अवतीभोवती दिसणाऱया गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत, ऐकू येणाऱया पक्षांचे आवाज संपलेत. या सगळय़ांची अनुभूती देणारी विठुरायाची पालखी म्हणजेच, ‘वारी’ हा सगळा जीवनाभुव देते अन् मातीशी नाळ जोडायचा प्रयत्न करत पूर्वी एक ‘अक्ष-पाद’ नावाचे ऋषी होऊन गेले. त्यांच्या नावाचा अर्थ म्हणजे पायाला डोळे आहेत असा चालणाऱयाला दुष्टी येते. कानाने ऐकू येते म्हणजेच चालणाऱयाचे भाग्य चालते; पण आमचे हे भाग्य आम्ही घालवून बसलो. म्हणूनच संत लिहून जातात.

पंढरीची वारी । आहे माझे घरी ।।

आणिक न करी अन्य तीर्थ

असं म्हणून आपणही चालण्याचा निश्चय करू, पालखीच्या बरोबर प्रत्यक्ष चाललो नाही तरी आपल्या जीवनाची, जगण्याची पालखी शेवटाला जाईपर्यंत आपल्या रोजच्या व्यवहारात निश्चलपणा हवा तो येतो. म्हणूनच आरोग्य उत्तम राहण्यासाठी वारीबरोबर, विविध उपक्रमातून चालत रहा आणि त्या पांडुरंगाच्या समचरणाचे दर्शन घ्या. तो समचरणा म्हणजेच, ‘शांत निश्चल’ आहे. लहानपणी चार पायांवर रांगलो, मोठेपणी दोन पायांवर चाललो, म्हातारपणी तिसरा पाय मिळाला (काठीचा) आता समचरणावर स्थिर व्हायला हवं निश्चल शांत.

सोहळ्यावर दुःखाची छाया; मृत वारकऱयांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत करावी

पालखी सोहळा पंढरपूरकडे वाटचाल करीत असताना वारकऱयांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना घडत असतात. फलटण तालुक्यातच यंदा तरडगाव येथे अपघातात एका भाविक महिलेसह तीन वारकऱयांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. फलटण येथे पालखी तळावर दोन वारकऱयांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या विविध प्रकारच्या अपघातात फलटण तालुक्यातच सहा जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे आळंदी ते पंढरपूर या वाटचाली दरम्यान जखमी व मृत पावणाऱया वारकऱयांना राज्य शासन व आळंदी-पंढरपूर देवस्थान यांच्या वतीने मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.