|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मिऱया बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती

मिऱया बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती 

जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या सूचना

ग्रामस्थ, अधिकाऱयांसमवेत पाहणी

तज्ञ संस्थेमार्फत होणार सर्वेक्षण

कायमस्वरूपी उपाययोजनेची ग्वाही

प्रतिनिधी /रत्नागिरी

उधाणाच्या भरतीने वाताहात झालेल्या मिऱया किनाऱयावरील धुपप्रतिबंधक बंधाऱयाची मंगळवारी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी अधिकारी व ग्रामस्थांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. नुकसान झालेल्या बंधाऱयांची 50 लाखाच्या तातडीच्या निधीतून तात्काळ दुरूस्ती सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. त्याचबरोबर शासनाच्या तज्ञ संस्थेमार्फत किनाऱयाचा सर्व्हे करून दुरूस्ती व डागडुजीच्या कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची ग्वाही जिल्हाधिकाऱयांनी ग्रामस्थांना दिली.

उधाणाच्या भरतीने कोकण किनारपट्टीवर सर्वत्र दाणादाण उडाली असून मिऱया पंधरामाड, अलावा, भाटिमिऱया येथील धुपप्रतिबंधक बंधाऱयाची वाताहात झाली. मिऱया पंधरामाड धूपप्रतिबंधक बंधाऱयाला अनेक ठिकाणी भगदाडे उधाणाचे पाणी वस्तीमध्ये शिरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

पंधरामाड येथील ढासळलेला धूपप्रतिबंधक बंधाऱयाला प्रचंड मोठे भगदाड पडले. सुमारे 70 फुटापेक्षा जास्त लांबीचा बंधाराच वाहून गेला. अलावा, तसेच लगतच्या बंधाऱयाचीही तशीच अवस्था आहे. नारळाची झाडे ग्रामस्थांच्या डोळय़ादेखत समुद्राने गिळंकृत केली. या पार्श्वभुमीमवर संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांची भेट घेत कैफीयत कथक केली. तसेच कागदोपत्री होत असलेली डागडुजी व कामाच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त करत त्याबाबत निवेदन दिले होते. ग्रामस्थांची बाजू ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱयांनी संबधीत अधिकाऱयांसह धूपप्रतिबंधक बंधाऱयाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, बंदर अधिकारी कॅ. संजय उघलमगले, पतन विभागाचे अधिकारी यांच्यासह आप्पा वांदरकर, विजय सालीम व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या सहकार्यातून उपाययोजना

जिल्हाधिकाऱयांनी ग्रामस्थांची व्यथा ऐकून घेत त्याठिकाणी शासनाच्या तज्ञ संस्थेमार्फत तातडीने सर्व्हे करण्याची ग्वाही दिली. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा केली जाईल. त्यासंदर्भात बैठक घेऊन ग्रामस्थांनाही सहभागी करून घेण्यात येईल. त्या बैठकीतून बंधारा उपाययोजनेबाबत योग्य कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांनी सांगितले. मात्र त्यापूर्वी तातडीची उपाययोजना म्हणून ढासळलेल्या बंधाऱयांच्या ठिकाणी दगडांची दुरूस्ती करण्याच्या कामाला प्रारंभ करण्याच्या सूचना संबधित पतन विभागाच्या यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. तसेच टेट्रॉपोईड टाकण्याच्या प्रस्तावाबाबतही विचारविनियमय केला जाईल असेही सांगितले.

मिऱया बंधाऱयाची केवळ ‘कागदी’ दुरूस्ती

मिऱया किनाऱयावर होणारे समुद्राचे अतिक्रमण रोखण्याबाबत केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप करत असून याबाबत सखोल चौकशीची मागणी मिऱयावासियांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली हेती. सर्वच शासकीय यंत्रणेचे याबाबत दुर्लक्ष सुरू असून धुपप्रतिबंधक बंधाऱयाच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळेच हे संकट ओढवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. त्यावेळी आप्पा वांदरकर, बंडय़ा सालीम, बाबा नागवेकर, आरती पाटील, मिरा पिलणकर, मृणाल परब यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बंधारा टेट्रॉपोईडने बांधण्याची मागणी

समुद्र उधाणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून येथील ग्रामस्थांना स्थलांतराच्या नोटीसा बजावण्यात येतात. मात्र अतिक्रमाणाच्या पार्श्वभुमीवर उपाययोजनांची पूर्वतयारी केली जात नाही. वस्तुस्थिती जाणून घेतली जात नाही. अनेकवेळा याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आले मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही नाही. त्यामुळे सर्व कामाची सखोल चौकशी व्हावी. तसेच उध्वस्त बंधारा दगडाचा न करता टेट्रॉपोईड टाकून टप्प्याटप्प्याने बांधण्याची मागणी जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली