|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » श्रीमद्भागवताचे पंचप्राण

श्रीमद्भागवताचे पंचप्राण 

भगवंताने गोपींबरोबर केलेल्या रासलीलेचे अंतरंग उलगडून दाखवताना पू. स्वामी तेजोमयानंदजी पुढे म्हणतात-हेमंत ऋतूमध्ये भगवंतांनी व्रतधारी गोपिकांना सांगितले होते की-मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार केला आहे. मी तुमची इच्छा पूर्ण करीन. आता श्रुती, ऋषि, गोपिका इतक्मया सगळय़ांना दिलेले वचन पूर्ण करणे हा ईश्वराचा धर्म आहे की नाही? जीव जर भगवंतांना प्राप्त करून घेण्याची इच्छा करीत असेल तर जीवाची इच्छा पूर्ण करणे हे भगवंताचे कर्तव्य नाही का?

आता आपण रासपञ्चाध्यायीमध्ये प्रवेश करूया. हे श्रीमद्भागवताच्या दशम स्कंधाचे पंचप्राण आहेत. ज्यांना या रासलीलेचा आध्यात्मिक अर्थ समजत नाही अशा काही लोकांचे म्हणणे आहे, की या पाच अध्यायांना काढून टाकले तर भागवत ठीक ठाक होईल. त्याचा अर्थ असाच ना, की कोणत्याही शरीरातून प्राण काढून टाका म्हणजे शरीर चांगले होईल! श्रीमद्भागवतातील हे पंचप्राणरूपी अध्याय म्हणजे प्रत्यक्ष आनंदच. ते काढून टाकले तर जीवनात राहणार काय? तैतरिय उपनिषद् म्हणते-

को ह्येवान्यात्क: प्राण्याद् , यदेष आकाश आनन्द न स्यात् ।

आत्मा आनंदस्वरूप नसता तर जगण्याची इच्छा तरी कोणाला झाली असती? ह्या संसारात इतके दु:ख भरले आहे तरी मनुष्य मरण्याची इच्छा करीत नाही. कारण त्याला असे वाटते की थोडा तरी आनंद मिळेल. येथे तर आनंदस्वरूप परमात्माच श्रीकृष्णाच्या रूपात अवतरला होता.

श्रीकृष्णाने गोपिका आणि कुमारिका यांना ज्या रात्रींचा संकेत केला होता, त्या सर्व शरद ऋतुतल्या रात्री एकीभूत झाल्या होत्या. ते पाहून त्याला जाणवले की, ती वेळ आता आली आहे. आपल्या योगमायेचा आश्रय घेऊन आता मी रासलीला करतो. कारण सगळय़ांचे अंत:करण शुद्ध झालेले आहे. आता श्रीकृष्ण त्यांना ब्रह्मानंदाचा अनुभव देण्यास उद्युक्त झाला.

श्रीकृष्ण यमुनेच्या तीरावर उभा आहे. त्या पौर्णिमेच्या रात्रीचे सौंदर्य पाहून त्याचे मन आनंदाने भरून गेले. त्याने आपली बासरी घेऊन अधरांवर धरली आणि तिच्यात आपले प्राण फुंकले. त्याबरोबर तिच्यातून अत्यंत मधूर स्वर उमटले.

तो बासरीचा स्वर मनातील कामना उद्दिप्त करणारा होता. काय कारण? कामदेवाची भगवंताशी लागलेली पैज! श्रीकृष्णाचे त्या वेळेचे वय फक्त सात वर्षाचे होते हे विसरता कामा नये. त्याने जेव्हा हे सूर छेडले, तेव्हा गोपिका घरकाम करण्यात दंग होत्या. त्यांनी सर्व काही जेथल्या तेथेच थांबवले. काहीजणी गोदोहन करीत होत्या, ते त्यांनी सोडले व धावत निघाल्या. काही जणी आपल्या बालकांना निजवत होत्या. काही जणी पतिसेवा करीत होत्या. काही जणी आपल्या पतींना भोजन वाढीत होत्या. तर काही जणी सकाळी उशीर होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी जमीन शेणाने सारवीत होत्या. त्या जशा होत्या त्याच स्थितीत धावत सुटल्या. काय होत आहे याचे त्यांना भानही नव्हते. जणू काही बासरीची तान ऐकून त्या वेडावल्या होत्या. त्या जात होत्या याचेही त्यांना भान नव्हते.

Ad. देवदत्त परुळेकर